पेपरफुटी आणि कॉपी यांविरोधात कठोर कायदा करावा ! – काँग्रेसची राज्‍यपालांकडे मागणी

मुंबई – महाराष्‍ट्रात अस्‍तित्‍वात असलेल्‍या पेपरफुटीविरोधी कायद्यामध्‍ये कठोर शिक्षेचे प्रावधान नाही. त्‍यामुळे अक्षरशः टोळ्‍या करून प्रश्‍नपत्रिका फोडल्‍या जात आहेत. यामुळे गोरगरीब उमेदवार रात्रंदिवस अभ्‍यास करूनही मागे पडत आहेत. हे प्रकार थांबवण्‍यासाठी ‘राजस्‍थान आणि उत्तराखंड राज्‍यांप्रमाणे महाराष्‍ट्रात लवकरात लवकर कठोर कायदा करावा’, अशी मागणी महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्‍यक्ष नाना पटोले यांनी राज्‍यपालांकडे केली आहे.

नाना पटोले यांनी नुकतेच काँग्रेसच्‍या शिष्‍टमंडळासह राजभवन येथे जाऊन राज्‍यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन स्‍पर्धा परीक्षांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना येणार्‍या अडचणींची माहिती राज्‍यपालांना दिली. या वेळी त्‍यांच्‍यासमवेत राज्‍यातील काही विद्यार्थीही होते. याविषयीचे निवेदन काँग्रेसकडून राज्‍यपालांना देण्‍यात आले.

या निवेदनामध्‍ये म्‍हटले आहे की, मुंबई पोलीस भरती, वनविभाग, तलाठी भरती, तसेच महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यांमध्‍ये ‘पेपरफुटी’ आणि ‘कॉपी’ यांचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. राज्‍य सरकारच्‍या पाठबळाने खासगी आस्‍थापनांकडून प्रत्‍येक भरती प्रक्रियेत १ सहस्र रुपये शुल्‍काच्‍या नावाखाली गोरगरीब विद्यार्थ्‍यांची लूट केली जात आहे. या सर्व परीक्षा महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडे देऊन लाखो उमेदवारांना न्‍याय द्यावा. महाराष्‍ट्र राज्‍यसेवा आयोगाद्वारे निवड झालेले अनेक उमेदवार वेगवेगळे शासन धोरण, आरक्षण किंवा अन्‍य काही कारणांमुळे न्‍यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत. अशांना न्‍यायालयीन निकालाच्‍या अधीन राहून नियुक्‍ती देण्‍यात यावी.

संपादकीय भूमिका

पेपरफुटी आणि कॉपी या माध्‍यमांतून होणार्‍या नीत्तीमत्तेच्‍या र्‍हासाला आतापर्यंत देशावर राज्‍य केलेली काँग्रेसच उत्तरदायी !