नाशिक येथील ६ तरुणांचे डोळे भाजले; मुंबई, ठाणे, धुळे येथेही घटना !

श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर लाईट’मुळे डोळे गमावण्याची वेळ !

(‘लेझर लाईट’ म्हणजे विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे निर्माण झालेला प्रकाश)

नाशिक – गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ‘डीजे’च्या (मोठ्या ध्वनीक्षेपक यंत्रणेच्या) दणदणाटामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केवळ आवाजामुळेच नव्हे, तर ‘लेझर लाईट’च्या झगमगाटामुळे नाशिक येथील ६ जणांना त्यांची दृष्टी गमवावी लागली आहे. हे सर्व तरुण २०-२५ वयोगटातील आहेत. ‘लेझरच्या लाईट’मुळे डोळ्यांवरच थेट परिणाम होत आहे. धुळे, मुंबई आणि ठाणे येथेही असे रुग्ण आढळले आहेत.

नाशिक येथे विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे लावण्यास प्रतिबंध आहे; मात्र यंदा ८ वर्षांनंतर डीजे लावण्याची अनुमती देण्यात आली होती. या मिरवणुकांमध्ये ‘लेझर लाईट’चाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. ‘लेझर लाईट’च्या थेट संपर्कात आल्याने आधी या मुलांना अंधुक दिसू लागले. नंतर त्यांचे डोळे चुरचुरू लागले. डोळे चोळल्यामुळे त्यातून रक्तस्राव होऊ लागला. त्यांना रुग्णालयात भरती केल्यावर नेत्ररोगतज्ञांनी पडताळले असता काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाल्याचे दिसले, तर काही तरुणांच्या डोळ्यांवर भाजल्यासारखे व्रण आढळून आले. अद्याप या तरुणांची नावे समजू शकली नाहीत. त्यामुळे रात्रीच्या मिरवणुकांमध्ये ‘लेझर लाईट’चा वापर टाळावा, असे आवाहन आधुनिक वैद्यांनी केले आहे.