पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

महाखाजन-धारगळ येथे महामार्गावर दरड कोसळली

पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) : गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. पनवेल येथे मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला अल्प दाबाचा पट्टा प्रवाहित झाला आहे. सर्वत्र पडझडीचे सत्र चालूच आहे. गोव्यात गेल्या २४ घंट्यांत सरासरी ६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे आणि यामुळे घरांच्या पडझडीबरोबर रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी संथ गतीने वाहतूक चालू आहे.

गोव्यात पावसामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम

पणजी – महाखाजन-धारगळ येथे महामार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. माडेल-चोडण येथे फेरीबोट धक्क्याजवळील रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे. चिंचिणी येथे जुन्या आणि जीर्ण झालेल्या पोर्तुगीजकालीन इमारतीचा भाग अचानक कोसळला. रुमडामळ भागात एका घरावर दरड कोसळली आणि या दुर्घटनेत महिला थोडक्यात वाचली. पश्‍चिम किनारपट्टीत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे विमान सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. सकाळच्या वेळी काही विमाने नियोजित वेळेपेक्षा उशिरा ये-जा करत होती. पणजी शहरात अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. पाटो परिसर जलमय झाला आहे. पर्ये पंचायत क्षेत्रातील म्हाळशेकरवाडा येथील केसर म्हाळशेकर यांच्या घराचा एक भाग कोसळला आहे. स्थानिक पंचायतीने त्यांना आर्थिक साहाय्य केले आहे.

(सौजन्य : RDXGOA GOA NEWS) 

माडेल-चोडण येथे फेरीबोट धक्क्याजवळील रस्ता पूर्ण पाण्याखाली

 काजूगाट्टो, सांगे येथे मातीचा रस्ता वाहून गेला

काजूगाट्टो, सांगे येथे एका ठिकाणी मातीचा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला. या भागात सुमारे ३० कुटुंबे रहातात.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

रस्ता वाहून गेल्याने येथील नागरिकांची गैरसोय झाली आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या मते स्थानिकांनी भूसंपादनासाठी संबंधित भूमीच्या मालकाचा ‘ना हरकत दाखला’ आणल्यास त्या ठिकाणी सरकार डांबरी रस्ता करू शकणार आहे.

पनवेल येथे मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रहित

मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली मार्गावर मालगाडीचे ५ डबे घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पावसामुळे हा मार्ग सुरळीत करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशत: रहित करण्यात आल्या आहेत.

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार असल्याची वेधशाळेची चेतावणी

वेधशाळेने प्रतिघंटा ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वहाणार असल्याची चेतावणी दिली आहे. काही ठिकाणी वार्‍याचा वेग प्रतिघंटा ६० कि.मी. पर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष सक्रीय केले आहेत. पावसामुळे नदी आणि नाले यांना पूर आला आहे. केरी येथील अंजुना धरणाचे चारही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग (पाणी सोडणे) करण्यात आला आहे. वाळवंटी, पार, नानोडा या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे. वाळवंटी नदीच्या परिसरातील पंप चालू करण्यात आले आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी !

सिंधुदुर्ग – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अल्प दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यात जाणवला. बहुतांश भागात गेले २ दिवस सोसाट्याच्या वार्‍यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. दिवसभर पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठी हानी झाली. याचा अधिकतर फटका वीज वितरण आस्थापनाला बसला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

पणतुर्ली येथे सार्वजनिक विहीर कोसळली

दोडामार्ग तालुक्यात पणतुर्ली येथे सार्वजनिक विहीर कोसळली. खोक्रल येथे प्रकाश वेर्णेकर यांच्या घराची मातीची भिंत कोसळली. तळेखोल येथे श्री केळबाई मंदिरावर झाडाची फांदी पडून मंदिराची हानी झाली. झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता, तसेच वाहतूकही विस्कळीत झाली होती.

सावंतवाडी शहरासह तालुक्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून हानी झाली. वाहतूकही विस्कळीत झाली. वादळसदृश हवामानामुळे देवगड बंदरामध्ये ४०० हून अधिक मासेमारी नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्रयासाठी आल्या आहेत.

आता भातपिक परिपक्व होत आले आहे. हा पाऊस असाच पडत राहिला, तर  भातपिकाची हानी होण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि समुद्राला आलेले उधाण यांच्या पार्श्‍वभूमीवर ३ ऑक्टोबरपर्यंत मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरपासून हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी नदीच्या पात्रात उतरू नये, तसेच नदीच्या पात्रात कपडे धुणे, गुरांना पात्रात नेणे आदी कामे करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.