‘हिंदु आणि हिंदुत्व, म्हणजे ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ’!

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १०

‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि !’- उत्तरराचमरितम्, अध्याय २, श्‍लोक ७

अर्थ : चांगल्या लोकांचे हृदय वज्रापेक्षाही कठोर आणि फुलापेक्षाही कोमल असते.

१. छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता देश किंवा धर्म विघातक नव्हे !

छत्रपती शिवाजी महाराज

‘कट्टर हिंदु असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात रहाणार्‍या अन्य धर्मियांना कधीही सापत्न (सावत्र) वागणूक दिली नाही. त्यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा कधी अवमान केला नाही, ना त्यांची प्रार्थनास्थळे कधी उद्ध्वस्त केली. अन्य धर्मियांवर ना कधी वेगळे कर लादले, ना अन्य धर्मियांच्या स्त्रियांकडे वाकड्या दृष्टीने पाहिले; कारण छत्रपती शिवराय हे कट्टर हिंदुत्वनिष्ठ असले, तरी धर्मांध नव्हते, तर धर्मनिरपेक्ष होते आणि ही धर्मनिरपेक्षता जशी जन्मतःच प्रत्येक हिंदूच्या रक्तात म्हणा किंवा ‘डी.एन्.ए.’मध्ये म्हणा असते, तशी ती छत्रपती शिवरायांच्याही रक्तातच होती; पण आज ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ ‘हिंदूंना लाथा मारणे आणि मुसलमान-ख्रिस्ती यांच्या दाढ्या कुरवाळणे’, असा लावला जातो, अशी विकृत, देश अन् धर्म विघातक धर्मनिरपेक्षता छत्रपती शिवरायांना मुळीच मान्य नव्हती.

श्री. शंकर गो. पांडे

२. छत्रपती शिवरायांनी धर्मांतरितांना परत हिंदु  धर्मात घेण्याची परंपरा निर्माण केली !

फलटणचे जहागीरदार बजाजी निंबाळकर हे एक मोठे प्रस्थ होते. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी राजे आणि बजाजी निंबाळकर दोघेही विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारातील मातब्बर सरदार होते. बजाजी निंबाळकर यांची बहीण सईबाई यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत झाला होता; पण पुढे आदिलशहाने बजाजींना बाटवून इस्लामची दीक्षा दिली. बळजोरीने स्वीकारलेल्या इस्लाममध्ये बजाजींचा जीव गुदमरत होता. त्यांनी परत हिंदु धर्मात प्रवेश करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली. असे म्हणतात की, छत्रपती शिवरायांनी बजाजींना परत हिंदु धर्माची दीक्षा देण्यासाठी शिंगणापूर येथे एका धर्मसभेचे आयोजन केले होते. धर्मसभेने बजाजींच्या हिंदु धर्मातील पुर्नप्रवेशास विरोध केला; पण छत्रपती शिवराय अत्यंत दूरदृष्टीचे होते. त्यांनी धर्मसभेची कडक शब्दांत कानउघाडणी केली. धर्मांतर केलेल्यांना हिंदु धर्मातील घातक आणि विकृत प्रथा-परंपरांना मूठमाती देण्यास सांगून त्यांनी बजाजींना परत हिंदु धर्माची दीक्षा देण्यास धर्मसभेला बाध्य केले. बजाजींनी हिंदु धर्म स्वीकारताच छत्रपती शिवरायांनी त्यांची मुलगी सखूबाई हिचा विवाह बजाजींच्या महादजी नावाच्या मुलासमवेत लावून दिला आणि बजाजींना समाजात पूर्ववत् प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या सर्व कार्यात राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवरायांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होत्या. धर्मांतरितांना परत आपल्या धर्मात सन्मानाने घेणे म्हणजे हिंदुत्व !

३. नेताजी पालकरांनाही परत स्वधर्माची दीक्षा देणे !

एखादा हिंदु जेव्हा धर्मांतर करून मुसलमान अथवा ख्रिस्ती होतो, तेव्हा केवळ हिंदूंची लोकसंख्या एकाने न्यून होते, असे नाही, तर ‘हिंदूंच्या शत्रूसंख्येत एकाने वाढ होते’, याची पुरेपूर जाणीव छत्रपती शिवरायांना होती. नेताजी पालकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात ! त्यांना ‘प्रतिशिवाजी’ असेही म्हटले जात असे; पण एकदा त्यांच्या हातून कर्तव्यात कसूर झाली आणि कर्तव्यकठोर छत्रपती शिवराय अन् त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. नेताजी रागारागाने प्रथम आदिलशहा आणि नंतर मोगल यांना जाऊन मिळाले. छत्रपती शिवरायांनी आगर्‍याच्या कैदेतून आपली शिताफीने सुटका करून घेतली. याचा राग औरंगजेबाने नेताजी पालकवर काढला. त्यांना कैदेत टाकून सुटकेसाठी त्यांच्यासमोर इस्लाम स्वीकारण्याची अट ठेवली. नेताजींनी ही अट नाकारताच त्यांचा अमानुषपणे छळ करण्यास आरंभ केला. शेवटी अनन्वित छळाला कंटाळून नेताजींनी इस्लाम मान्य केला. त्यांना इस्लामची दीक्षा दिल्यानंतर नेताजींचे नाव पालटून ते महंमद कुलीखान असे ठेवण्यात आले; पण नेताजींना स्वतःचे झालेले धर्मांतर पुष्कळ जाचत होते. त्यांना सतत पश्‍चात्ताप होत होता. शेवटी एकदा संधी साधून नेताजींनी औरंगजेबच्या सैन्यातून पळ काढला आणि थेट रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली. रायगडावर साधक-बाधक चर्चा झाली आणि छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकर यांनाही परत विधीपूर्वक हिंदु धर्माची दीक्षा दिली. तो दिवस होता १९ जून १६७६. एकूण काय, तर बळजोरीने अथवा आमीष दाखवून अन्य धर्मियांचे धर्मांतर न करणे; पण कुणी हिंदूंचे धर्मांतर करत असेल, तर त्यांना परत हिंदु धर्माची दीक्षा देण्यास मागे-पुढे न पहाणे म्हणजे हिंदुत्व !

४. धर्मांतरासाठी हिंदूंचा छळ करणार्‍या ४ पाद्य्रांचा छळ करून ‘जशास तसे’ उत्तर देणे !

छत्रपती शिवरायांनी ‘जशास तसे’ नीतीचा वापर करून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर त्यांचा धाक निर्माण केला होता. आगर्‍याहून सुटका करून घेतल्यानंतर महाराज गोव्याच्या किनारपट्टीवर पोचले होते. तेथे गेल्यानंतर महाराजांना कळले की, पोर्तुगीज व्हॉईसरायने गोव्यात हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याची मोहीम उघडली आहे. ‘हिंदूंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा’, असा फतवाच त्याने काढला होता. जे या फतव्याचे पालन करत नव्हते, त्यांचा अत्यंत क्रौर्यतेने छळ केला जात होता. काही हिंदूंनी ही गोष्ट महाराजांच्या समोर कथन केली, तेव्हा महाराज संतप्त झाले. त्यांनी पोर्तुगिजांच्या कह्यातील एक गाव लुटले आणि तेथील ४ पाद्य्रांना अटक केली. त्यांच्यासमोर हिंदु धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला; पण पाद्य्रांनी या प्रस्तावास नकार दिला. त्यांचा नकार ऐकताच महाराजांनी चारही पाद्य्रांचा शिरच्छेद केला. ही वार्ता व्हॉईसरॉयला कळताच त्याने त्याचा ख्रिस्तीकरणाचा फतवा त्वरेने मागे घेतला !

 ५. हिंसेला प्रतिहिंसेने उत्तर देणे म्हणजे हिंदुत्व !

मूलतः हिंस्र असणार्‍या श्‍वापदांना दयेची, अहिंसेची भाषा काय कळणार ? म्हणून ‘हिंसेला प्रतिहिंसेने उत्तर देणे म्हणजे हिंदुत्व !’ विदुरनीती सांगते,

‘कृते प्रतिकृतिं कुर्यात् हिंसितं प्रतिहिंसितम् ।
न तत्र दोषं पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत् ॥’’

अर्थ : कृतीला प्रतिकृतीने, हिंसेला प्रतिहिंसेने उत्तर देणे यांत कोणतेही पाप नाही. शेराला सव्वाशेर आणि ठकास महाठक होणे आवश्यक आहे.

६. अरुणाचलेश्‍वराच्या मंदिराच्या जागी उभारलेली मशीद छत्रपतींनी तोडून परत मंदिर उभारणे !

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असतांना त्यांचा मुक्काम तिरुवण्णामलई या गावात होता. तेथील मुक्कामात त्यांना कळले की, तेथील अरुणाचलेश्‍वरचे शिवमंदिर पाडून मुसलमानांनी मशीद बांधली. त्यांनी त्वरित अरुणाचलेश्‍वर मंदिराच्या पुजार्‍यास बोलावून घेतले. त्याच्याकडून मंदिराचा इतिहास जाणून घेतला. पुजार्‍याने मंदिराच्या अस्तिवाचे अनेक पुरावे महाराजांसमोर सादर केले. पूजेच्या सनदीही (कागदपत्रेही) दाखवल्या. मंदिर तोडून तेथे मशीद उभारल्याची खात्री पटताच महाराजांनी आपल्या सैनिकांना मशीद तोडण्याची आज्ञा दिली. केवळ मशीद तोडूनच महाराज स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी तेथे परत अरुणाचलेश्‍वराचे शिवमंदिर उभारले.

७. चर्चने गिळंकृत केलेले सप्तकोटीश्‍वराचे मंदिर परत उभारले !

गोव्यात डिचोली गावाजवळ सप्तकोटीश्‍वराचे एक पुरातन शिवमंदिर होते. मुसलमानांनी त्याचा विध्वंस केला होता. विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचे प्रधानमंत्री विश्‍वारण्यस्वामी यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता; पण गोव्यावरील पोर्तुगिजांच्या राजवटीत ख्रिस्ती पाद्य्रांनी त्या मंदिराचा परत विध्वंस करून तेथे चर्च उभारले होते. गोव्याच्या मोहिमेवर असतांना छत्रपती शिवरायांना ही माहिती सांगण्यात आली. त्यांनी चर्चमधील सर्व पाद्य्रांना पिटाळून लावले आणि चर्च पाडून तेथे परत सप्तकोटीश्‍वराच्या शिवमंदिराची उभारणी केली.

८. मंदिरांचे पुनर्निर्माण करणे म्हणजे हिंदुत्व !

तात्पर्य, कुणाही अन्य धर्मियांचे प्रार्थनास्थळ न पाडणे; पण स्वतःचे प्रार्थनास्थळ पाडून तिथे कुणी मशीद अथवा चर्च उभारले, तर हा अन्याय सहन न करता मंदिराच्या जागी बांधलेली मशीद अथवा चर्च भुईसपाट करून तेथे आपल्या पूर्वीच्या मंदिराचे पुनर्निमाण करणे म्हणजे हिंदुत्व !

९. धर्म, भारतमाता असो कि गोमाता, यांच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करणे म्हणजे हिंदुत्व !

‘धर्म एव हतो हान्ति धर्मो रक्षति रक्षितः । (महाभारत, पर्व ३, अध्याय ३१३, श्‍लोक १२८) म्हणजे ‘धर्माला जे हानी पोचवतात, त्यांचा धर्म नाश करतो आणि धर्माचे जे रक्षण करतात त्यांचे धर्म रक्षण करतो’, यावर ठाम विश्‍वास असणे म्हणजे हिंदुत्व !

धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज, शिखांचे ५ वे धर्मगुरु अर्जुनदेव, शिखांचे ९ वे गुरु तेगबहादूर, १० वे गुरु गुरु गोविंदसिंह यांचे अवघ्या ६ वर्षांचे जोरवारासिंह आणि ८ वर्षाचे पुत्तेहसिंह हे सुपुत्र, भाई मतिदास, बंदा बहादूर (बैरागी) यांच्यासह सहस्रो हिंदू अन् शीख बांधवांनी प्रचंड वेदनादायी मृत्यू स्वीकारला; पण स्वतःचा धर्म पालटला नाही. आपला धर्म असो, भारतमाता असो कि गोमाता, यांच्या रक्षणासाठी वाटेल ते दिव्य करणे, वेळ पडल्यास हसत हसत हौतात्म्य पत्करणे म्हणजे हिंदुत्व !

१०. ‘जशास तसे’ शिकवण देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज !

संत तुकाराम महाराज

भारतातील अनेक संतांवर अनेकदा त्यांनी समाजाला निष्क्रीय, दैववादी आणि दुबळे बनवले, असे आरोप होत असतात; पण त्यांच्या सर्व साहित्याचा अभ्यास केला, तर हे आरोप किती फोल आहेत, याची प्रचीती येते. मातृहृदयी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर अनेक अभंगातून ‘जशास तसे’ या हिंदुत्वाच्या व्यवच्छेदक लक्षणाचा उच्चरवाने उद्घोष केला आहे. ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे ।’, आम्ही मेणाहून मऊ असलो, तरी कठीण वज्रास भेदण्याचीही आमची क्षमता आहे. ‘अमृत ते काय गोड आम्हापुढे, विष तें बापुडें कडू किती ।’, आम्ही अमृतापेक्षा ही अधिक गोड आहोत; पण प्रसंगानुरूप आम्ही विषापेक्षाही अधिक जहाल होऊ शकतो. ‘मायबापाहुनि बहु मायावंत, करू घातपात शत्रुहूनि ।’, आई-वडील करणार नाहीत इतकी माया आम्ही करू; पण वेळ पडल्यास शत्रूही करणार नाही एवढा घातपात आम्ही करू. ‘भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी ।’, सज्जन माणसाला आम्ही आमच्या कमरेची लंगोटीही देऊ; पण दुष्ट-दुर्जनांच्या डोक्यावर काठीचा प्रहार करण्यासही मागे-पुढे पहाणार नाही. ‘दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे ।’, ‘दया कशाला म्हणायचे ?’, याविषयी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की, प्राणीमात्रांचे पालन-पोषण करणे म्हणजे तर दयाच आहेच पण कंटकांचे म्हणजे दुष्टांचे निर्दालन करणे, हीसुद्धा दयाच आहे.

११. अधमांशी अधमपणानेच वागणे म्हणजेच हिंदुत्व !

समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणे, म्हणजे समाजाला त्यांच्या उपद्रवापासून मुक्त करणे, ही एक प्रकारची दया आहे. दुर्जनांशी चांगुलपणाचे वागणे किंवा त्यांचा अत्याचार सहन करण, म्हणजे एक प्रकारे सज्जनांवर अत्याचार करण्यासारखेच आहे; म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘‘विंचू देव्हार्‍यासी आला, देवपूजा नावडे त्याला । तेथे पैजाराचे काम, अधमाशी व्हावे अधम ।’’

विंचू देव्हार्‍यात आला, याचा अर्थ तो देवपूजेसाठी आला असा होत नाही. सदैव आपली विषारी नांगी कुणाला तरी मारण्यास सज्ज असणार्‍या विंचवाला देवपूजा कशी आवडणार ? म्हणून विंचू देव्हार्‍यात दिसला, तरी त्याचा अंत खेटरानेच केला पाहिजे. अधम लोकांशी सज्जनतेने वागून काही उपयोग नसतो. अधमांशी अधमपणानेच वागणे म्हणजेच हिंदुत्व !

हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुत्वनिष्ठ यांविषयी वाह्यात विधाने करणार्‍यांनी प्रथम हिंदुत्व म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे.

(क्रमश:)

–  श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.