स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध

पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्‍वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्‍या युरोपीयन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.

आजही एकीकडे विश्‍वाला ख्रिस्तीमय बनवण्याचे मोठे अभियान जगभर चालू आहे आणि दुसरीकडे ‘गजवा-ए-हिंद’, खुरासान, दारुल-ए-इस्लाम आदी विविध योजनांतर्गत विश्‍वाला इस्लाममय करण्यासाठी जिहादी मानसिकतेचे अरब देश पैशांच्या बळावर प्रयत्न करत आहेत. त्या समवेत अतिरेक्यांचे माहेरघर झालेल्या पाकिस्तानासह अल्-कायदा, इसिस आदी आतंकवादी संघटना अतिरेकी कारवायांद्वारे संपूर्ण जगात मुसलमानेतर जनतेच्या मनात भयाचे वातावरण निर्माण करत आहेत.

याच धर्तीवर भारतातील त्यांचे काही अनुयायी ‘भारतात शरियत लागू करा किंवा शरियत बँकिंग सेवा चालू करा, तसेच लव्ह जिहाद, लँड जिहाद यांद्वारे कार्यरत आहेत’, हे दिसून येते. आश्‍चर्य म्हणजे जे इस्लामला जिहाद किंवा अतिरेकी कारवायांशी जोडू इच्छित नाहीत, ते तटस्थ मुसलमान यांच्या विरोधात ‘ब्र’ही काढत नाहीत, ही शोकांतिका आहे; परंतु ‘गुन्ह्याचा मूकसंमतीदार शेवटी गुन्हेगारच ठरतो’, हे न्यायव्यवस्था सांगते.

या जागतिक परिस्थितीमध्ये सध्या हिंदू विचारक, अभ्यासक ‘स्वबोध’ आणि ‘शत्रूबोध’ या संज्ञांच्या प्रचलनांद्वारे हिंदु समाजामध्ये जनजागृतीचे अभियान चालवत आहेत; परंतु या संज्ञा आणि अभियानाची व्याप्ती वाढवली पाहिजे. स्वबोध, मित्रबोध, शत्रूबोध आणि उभयबोध या संज्ञांसह विकृत स्वबोध अन् विकृत शत्रूबोध या संज्ञाही योग्य अर्थासह वापरल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी हा लेखप्रपंच आहे.

 २४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध (स्वतःची शाश्‍वत ओळख करून देणे), व्यष्टी स्वबोध (व्यक्तीगत स्तरावरील धर्म जाणणे), समष्टी स्वबोध (स्वधर्म जाणून धर्मरक्षण अन् राष्ट्र्ररक्षण यांत योगदान देणे), विकृत (धर्मप्रतिकूल) स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/722254.html

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

३. हिंदु राष्ट्रात योग्य स्वधर्मबोध होणार्‍या योजना निर्माण कराव्या लागणार असणे 

हिंदूंना विकृत स्वबोधाकडून योग्य स्वबोधाकडे आणणे, म्हणजे धर्मरक्षण, धर्मप्रसार आणि राष्ट्ररक्षण करणे होय. जे योग्य स्वबोधाकडे वळत नाहीत, ते अज्ञानापोटी धर्म आणि राष्ट्र विरोधी कार्यात गुंतत जाण्याचा धोका असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. याची परिसीमा, म्हणजे हेच पुढे राष्ट्र आणि धर्म यांचे शत्रू ठरू शकतात. ‘अशांसाठी शासकीय, धार्मिक, देवालये आणि पारिवारिक यांच्या स्तरांवर उद्धारांच्या योजना, म्हणजेच योग्य स्वधर्मबोध होणार्‍या योजना हिंदु राष्ट्रात निर्माण कराव्या लागणार आहेत’, हे लक्षात असावे.

४. व्यक्तीगत स्वार्थ वा इच्छापूर्ती यांचे लक्ष्य न ठेवता केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या हितास्तव कार्यरत असणार्‍या व्यक्ती, म्हणजे स्वबोधासह मित्रबोध असणे

एखाद्या व्यक्तीच्या योग्य स्वबोधामुळे तिचे जीवन धर्मसंमत आणि आचरणशील असते. अशा व्यक्तींनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे स्वभावदोष आणि अहंकार अल्प होत असतो. त्यांच्या चित्तात ज्ञानयुक्त धर्मपालन आणि समष्टीतील धर्मरक्षण यांची जाण नित्य जागृत असतेे. अशा व्यक्तींना धर्मसंयुक्त विचारशील आणि आचारशील व्यक्ती, कुटुंब अन् समाज यांविषयी मित्रबोध निर्माण होतो. हा मित्रबोध राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य समर्थपणे करण्यास सक्षम असतो. स्वबोध आणि साधना यांच्या स्तरानुसार मित्रबोध असतो. अशा व्यक्तींकडे राष्ट्र आणि धर्म यांना शत्रू मानणार्‍या स्वकियांनाही ओळखण्याची पात्रता असते, तर त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्याशी सख्य मानणार्‍या परकियांनाही ओळखण्याची पात्रता असते. असे जीव कोणताही व्यक्तीगत स्वार्थ वा इच्छापूर्ती यांचे लक्ष्य न ठेवता केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी कार्यरत असतात. अशा व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या शत्रूंविषयी द्वेष, ईर्ष्या आदी काहीही मनात न ठेवता सतर्क असतात. प्रसंगी राष्ट्र किंवा धर्म यांच्या शत्रूंंना दंडित करण्यास व्यक्तीगत अथवा समष्टी स्तरावर प्रशासन आणि शासन यांना सहकार्य करतात.

महाभारतात दुर्योधनाला बंदीवान केल्यावर ‘आम्ही ५ नाही, १०५ आहोत’, हा युधिष्ठिराचा भाव ‘बंधुभाव’ या सदरात मोडतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदारांना जवळ करून बलाढ्य संघटन आणि सेना निर्माण करणे, हे याच सदरात मोडते. पेशव्यांनी धर्मरक्षणार्थ बुंदेलखंडच्या राजाच्या संकटात धावून जाणे, मेवाडच्या सिंहासनासमोर खाली बसणे, हेही या सदरात मोडते.

५. स्वबोधाविना मित्रबोध !

हा एका फसव्या व्यक्तीमत्त्वाचा मित्रबोध आहे. ज्या व्यक्तीला स्वबोध झालेला नसेल, तिचे चित्त स्वभावदोष आणि अहंकार युक्त असते. योग्य साधनेचा अभाव हा तिच्या आध्यात्मिक जीवनातील अडथळा ठरल्याने तिला ईश्‍वराचे साहाय्य ग्रहण करता येत नाही. अशा व्यक्तींना स्वेच्छानुकूल (व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे वागणार्‍या) व्यक्तींविषयी मित्रबोध, तर स्वेच्छाप्रतिकूल (व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध वागणार्‍या) व्यक्तींविषयी शत्रूबोध होतो. यांच्यामध्ये ‘माझे ते खरेच आणि माझ्या पाठीशी जे उभे, तेच माझे’, असा एकाकी अहंकारी बाणा असतो. अशा व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी प्रसंगी कटू वाटणारे असतात. त्यांच्यामध्ये विरोधी विचारांचे वाटणार्‍या व्यक्तींशी जुळवून घेण्यास सामर्थ्य नसते, अर्थात् खर्‍या मित्रांना ते ओळखू शकत नाहीत आणि ते त्यांच्या मैत्रीला मुकतात. अशा व्यक्तींच्या जीवनात जे मित्र येतात, तेसुद्धा स्वार्थी आणि स्वेच्छापूर्ती करणारे असून खोटी स्तुती, वाहवा करून स्वतःचा स्वार्थ साधणारे असतात. प्रसंगी असे मित्र राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याची हानी करतात अन् ते राष्ट्र आणि धर्म विरोधी ठरतात. असे मित्र ‘गरज सरो वैद्य मरो’, या उक्तीनुसार, एखाद्याची आवश्यकता संपली की, त्यांची मैत्रीही संपून जाते.

ज्या भारतीय राजांनी स्वतःची सत्ता राखण्यासाठी खोटी मैत्री करत इंग्रज अथवा इस्लामी राजवटींशी हातमिळवणी केली आणि नंतर इंग्रज किंवा इस्लामी राजवटींनी अन्य हिंदु धर्मनिष्ठ राज्यांना खालसा केले, तेव्हा जे डोळे मिटून गप्प बसले होते. असे सर्व राजे या सदरात मोडतात.

६. स्वबोधासह शत्रूबोध !

हा योग्य शत्रूबोध होय. स्वबोध झालेल्या व्यक्तीचे जीवन धर्मसंमत आणि आचरणशील असते. योग्य साधना करतांना केलेल्या प्रयत्नांमुळे तिचे स्वभावदोष आणि अहंकार न्यून झालेले असतात. व्यक्तीगत आणि समष्टी जीवनात त्यांची राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाची जाण नित्य जागृत असतेे. अशा व्यक्तींना स्वकीय असो अथवा परकीय, प्रत्यक्ष राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधी कार्य करणार्‍यांविषयी शत्रूबोध होतो, तसेच त्यांना बाह्यतः राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम दर्शवणारे; मात्र राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी आंतरिक विरोधी कारवाया करणार्‍यांविषयी शत्रूबोध सहजतेने होतो. अशा व्यक्तींपासून ते सावध किंवा सतर्क असतात. ते व्यष्टी किंवा समष्टी स्तरावर अशांना उघडे पाडून त्यांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी कायदासंमत मार्गाने शासन-प्रशासनाला बाध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. योग्य शत्रूबोध होण्यासाठी जसे निष्काम धर्म आणि राष्ट्र प्रेम आवश्यक असते, तसेच शत्रूला शिक्षा होण्यासाठी ईश्‍वरनिष्ठेसह कृतीशील रहाणेही आवश्यक ठरते.

भावनाशीलता नसल्याने ‘हा माझा (स्वकीय) आहे; म्हणून शत्रू मानणार नाही’, अशी उथळ राष्ट्र आणि धर्म विरोधी भूमिका हे घेऊ शकत नाहीत. त्यासह शत्रू बलाढ्य असेल, तर थोडे शांत राहून शत्रूला योग्य वेळी योग्य मार्गाने शिक्षा कशी देता येईल, या संधीची ते वाट पहात असतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना वेळीच ओळखणे, बलात्कारी रांझाच्या पाटलांना शिक्षा करणे, विजापूर दरबारात जातांना गोहत्या करणार्‍या कसायाचा हात कापणे किंवा वेळोवेळी स्वकीय, नातेवाईक, तसेच ५ पातशाह्यांचा बंदोबस्त करणे, ही योग्य शत्रूबोधाची उदाहरणे होय.

७. स्वबोधाबिना शत्रूबोध !

हा एका फसव्या व्यक्तीमत्त्वाचा शत्रूबोध आहे. ज्या व्यक्तीला स्वबोध झालेला नसेल, त्याचे चित्त अशुद्ध असते. अशा व्यक्तीला योग्य विश्‍लेषण किंवा समीक्षण करणे शक्य नसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यातील स्वभावदोष आणि अहंकार ! साधनेचा अभाव हा अशा व्यक्तींच्या आध्यात्मिक जीवनातील मोठा अडथळा ठरतो. अशा व्यक्तींना स्वेच्छानुकूल व्यक्तींविषयी मित्रबोध, तर स्वेच्छाप्रतिकूल व्यक्तींविषयी शत्रूबोध होतो. थोडक्यात या व्यक्तींच्या मनाविरुद्ध किंवा मताविरुद्ध असणारे सर्व यांना शत्रू वाटतात, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणारेही यांना शत्रू वाटू शकतात. हे चुकीचे आहे. तसेच जे धर्म मानत नाहीत किंबहुना जे धर्माला विरोध करतात किंवा जे या मातीशी, राष्ट्राशी निष्ठा ठेवायला सिद्ध नाहीत, ते यांना शत्रू वाटतीलच, असे नाही. स्वबोध नसणारे बहुतांश राष्ट्र आणि धर्म परायण स्वकीयांना शत्रू मानतात, असेही दिसून येऊ शकते. भारतात हिंदु धर्मावर टीका केली की, राजकीय भवितव्य घडवणे सोपे होते. अशांना सामाजिक माध्यमे डोक्यावर घेतात. त्यांना प्रसिद्धी मिळते. अशांना विदेशातील मिशनरी, इस्लामी किंवा साम्यवादी शक्ती यांचे समर्थन मिळते. हे पाहून अनेक जण जाणीवपूर्वक भारतीय परंपरा, सनातन धर्मीय, तसेच हिंदु संस्कृतीला स्वतःचे शत्रू घोषित करतात. हे जाणीवपूर्वक अयोग्य शत्रूबोधाचे उत्तम उदाहरण ठरते. असा शत्रूबोध असणार्‍यांचे संघटन लगेच होते आणि ते दीर्घकाळ टिकते; मात्र सत्ता किंवा लाभ अनुभवतांना यांच्यात आवेशयुक्त भांडण होते.

मिर्झा राजे जयसिंग यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेला ‘शत्रूबोध’ हा या सदरात मोडतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांच्या सावत्र आई सोयराबाई यांचा ‘शत्रूबोध’ या सदरात मोडतो.

एकूणच साधना करणे, चित्तशुद्धी करणे, धर्मशिक्षणासह धर्मशास्त्र जाणणे, कारणमीमांसा जाणणे, तसेच धर्माचरण करत, जेव्हा हिंदु व्यक्ती स्वबोध करून घेईल, तेव्हा रामराज्य (हिंदु राष्ट्र्र), हिंदवी स्वराज स्थापन करणे सहज शक्य होईल.’

संकलक : (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२०.५.२०२३)

संपादकीय भूमिका

धर्मशिक्षण घेणारी आणि धर्माचरण करणारी हिंदु व्यक्ती जेव्हा स्वबोध करून घेईल, तेव्हा रामराज्य (हिंदु राष्ट्र्र) स्थापन करणे सहज शक्य !