इस्रोच्‍या यशाचे श्रेय !

‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरल्‍यापासून देशभरातील जनतेमध्‍ये आनंद आहे. विदेशात रहाणार्‍या भारतियांनाही अभिमान वाटत आहे. भारताचे बहुतेक देशांकडून आणि अंतराळ संशोधन संस्‍थांकडून अभिनंदन करण्‍यात आले आहे. ‘भारताने साध्‍य केलेली गोष्‍ट अत्‍यंत कौतुकास्‍पद असल्‍याने त्‍याचे श्रेय घेण्‍याचा प्रयत्न होणार नाही’, असे भारतात कधीतरी होईल का ? भारताची अंतराळ संशोधन संस्‍था ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्‍वी केली आहे. त्‍यामुळे हे यश इस्रोचे आहे. इस्रोच्‍या शास्‍त्रज्ञांनी या यशासाठी पुष्‍कळ कष्‍ट घेतले आणि त्‍याचे फळ त्‍यांना मिळाले. वर्ष २०१९ च्‍या ‘चंद्रयान-२’च्‍या अपशयातून पुन्‍हा प्रयत्न करून आणि झालेल्‍या चुका सुधारून इस्रोने हे यश संपादन केले. हे अधिक महत्त्वाचे आहे. भारतीय जनता इस्रोचे कौतुक करत आहे. देशात सत्तेत असणार्‍या भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यशाचे श्रेय घेत आहेत, या भावनेतून काँग्रेस आणि अन्‍य राजकीय पक्ष त्‍यावर टीका करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरल्‍यानंतर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना काँग्रेसकडून ‘इस्रोची पायाभरणी नेहरू यांनी केल्‍याने आज आपल्‍याला हे यश मिळत आहे’, असे सांगून ‘या यशामागे काँग्रेस आहे’, असे दाखवून अप्रत्‍यक्षपणे ‘पंतप्रधान मोदी यांनी याचे श्रेय घेऊ नये’, असे सांगण्‍याचा प्रयत्न केला.

इस्रोचे माजी शास्‍त्रज्ञ नंबी नारायणन्

या संदर्भात इस्रोचे माजी शास्‍त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केलेले विधान महत्त्वाचे आहे. यातून काँग्रेसचे खरे स्‍वरूप उघड होते. नंबी नारायणन् म्‍हणाले, ‘इस्रोच्‍या प्रारंभीच्‍या काळातील सरकारांचे प्राधान्‍य अंतराळ संशोधन नव्‍हतेच आणि त्‍या वेळी इस्रोला मिळणारे पैसेही अत्‍यंत अल्‍प होते. संशोधनासाठी चारचाकी वाहनेही नव्‍हती. केवळ एक बस होती आणि तीही पाळ्‍यांमध्‍ये (शिफ्‍टमध्‍ये) चालवली जात होती.’ यातून स्‍पष्‍ट होते की, काँग्रेस जो दावा करत आहे, तो किती तकलादू आहे. नंबी नारायणन् यांनी जे सांगितले, ते सिद्ध करणारे काही पुरावे सार्वजनिक आहेत. यात इस्रोचे शास्‍त्रज्ञ सायकल आणि बैलगाडी यांवरून रॉकेटचे भाग घेऊन जात आहेत, हे दिसत आहे. प्रारंभीच्‍या काळात इस्रोच्‍या शास्‍त्रज्ञांना केरळमधील एक गाव देण्‍यात आले होते. तेथील एका चर्चमध्‍ये त्‍यांनी संशोधन केंद्र चालवले होते. येथेच विक्रम साराभाई यांनी पहिले रॉकेट बनवले होते. जर त्‍या वेळच्‍या काँग्रेस सरकारला खरेच इस्रोसाठी किंवा अंतराळ संशोधनासाठी काही करायचे असते, तर इस्रोची अशी स्‍थिती नसती. यावर काही जण ‘भारत गरीब देश असल्‍याने अशा प्रकारच्‍या संशोधनासाठी पैसे कुठून आणणार ? याचा विचार सरकारने केला असणारच’, असे म्‍हणतील. भारत आजही श्रीमंत देश नाही किंवा विकसित देश नाही, तरी आता जगाच्‍या तुलनेत भारताने अंतराळ संशोधनाकडे गांभीर्याने पाहिले आहे. विशेष म्‍हणजे शास्‍त्रज्ञ ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांच्‍यामुळे भारतात अंतराळ किंवा एकूणच संशोधनाकडे पहाण्‍याची दृष्‍टी पालटली आहे. जग ज्‍या गतीने विज्ञानाकडे वळत आहे, ते पहाता भारताला पुढे जाण्‍यासाठी त्‍याकडे लक्ष देण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आणि संशोधनावर खर्च करण्‍यासाठी पैसा उपलब्‍ध होऊ शकला; मात्र अन्‍य देशांच्‍या तुलनेत तो अत्‍यंत अल्‍प आहे. काँग्रेसच्‍या काळात वर्ष १९७५ मध्‍ये भारताने अणूबाँबची चाचणी घेतली होती. त्‍यानंतरही भारताने कधी अणूबाँब बनवले नव्‍हते. वर्ष १९७५ नंतर थेट वर्ष १९९८ मध्‍ये भारताने अणूबाँबची दुसरी चाचणी केली. मधल्‍या वर्षांत तत्‍कालीन सरकारांनी अणूबाँबच्‍या संदर्भात प्रगती करण्‍याचा प्रयत्न केला नाही, असे का झाले ? याचाही विचार करणे आवश्‍यक आहे. भारत गरीब देश आहे, याचा विचार इस्रोच्‍या संशोधकांनाही आहे आणि त्‍यांनी अन्‍य देशांच्‍या म्‍हणजे अमेरिका, रशिया, चीन यांच्‍या तुलनेत अगदी अल्‍प खर्चामध्‍ये ‘चंद्रयान-३’ मोहीम राबवली, याचाही विचार करणे आवश्‍यक आहे. एरव्‍ही राजकीय पक्ष आणि नेते सरकारी पैशांची उधळपट्टी करत असतांना भारतीय शास्‍त्रज्ञ पैसा वाचवून देशाचे नाव कसे जगभरात पोचवू शकतो, याचा विचार करत असतात, हे लक्षात घ्‍यायला हवे.

शास्‍त्रज्ञाचा छळ करणारे शासनकर्ते !

श्रेयाचा लाभ घेण्‍याचा विचार करतांनाच काँग्रेसच्‍या काळात भारतीय शास्‍त्रज्ञाला कसा त्रास देण्‍यात आला ? त्‍यांचा कसा छळ करण्‍यात आला, यावरही चर्चा करण्‍याची आवश्‍यकता आहे. नंबी नारायणन् हे भारताला रॉकेटच्‍या प्रक्षेपणासाठी आवश्‍यक असणारे ‘क्रायोजेनिक इंजिन’ बनवण्‍यासाठी प्रयत्नशील होते. अमेरिकेने भारताला हे इंजिन देण्‍यास नकार दिला होता. नंबी नारायणन् हे इंजिन बनवण्‍यात यशस्‍वीही होणार होते; मात्र त्‍याच वेळेस त्‍यांच्‍या विरोधात कट रचून त्‍यांना देशद्रोहाच्‍या खोट्या गुन्‍ह्याखाली अडकवून त्‍यांना कारागृहात डांबण्‍यात आले. त्‍यांचा प्रचंड छळ करण्‍यात आला. या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, हे लक्षात घ्‍यायला हवे.

पुढे अनेक वर्षे खटला लढवल्‍यानंतर न्‍यायालयाने नंबी नारायणन् यांना निर्दोष ठरवून त्‍यांना ५० लाख रुपये हानीभरपाई देण्‍याचाही आदेश दिला. त्‍यांना अडकवण्‍यात आल्‍याने भारताची मोठी हानी झाली. जे क्रायोजेनिक इंजिन नंबी नारायणन् बनवण्‍यात यशस्‍वी होणार होते, ते पुढे बनवायला भारताला अनेक वर्षे लागली. यामुळे भारताचे अंतराळ संशोधन अनेक वर्षे मागे राहिले. नंबी नारायणन् हे तेव्‍हा यशस्‍वी झाले असते, तर कदाचित् भारताने यापूर्वीच चंद्रावर यान उतरवले असते किंवा अन्‍यही अनेक संशोधन केले असते. ही हानी नंबी नारायणन् यांच्‍या वैयक्‍तिक जीवनापेक्षा पुष्‍कळ मोठी आणि भरून न येणारी आहे. याविषयी काँग्रेसवाले आणि अन्‍य राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत. नंबी नारायणन् यांनी जे विचार मांडले, त्‍याचा विचार करून भारत सरकार त्‍या दृष्‍टीने प्रयत्न करत आहे, असेही दिसते. भविष्‍यात भारताचा अंतराळवीर चंद्रावर उतरेल, याची निश्‍चिती भारतियांनी बाळगावी, असेच आताच्‍या स्‍थितीवरून वाटू लागले आहे.

इस्रोच्‍या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्‍वतःच्‍या सत्ताकाळात शास्‍त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !