परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्याचे कारण

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘मे २०२१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांची नखे कापली असता त्यांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे त्यांच्या (नखांच्या) सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नखांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. तुलनेसाठी म्हणून तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला १ साधक अन् १ साधिका आणि सनातनचे २ संत यांच्या नखांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या नखांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक अन् साधिका यांच्या नखांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. सनातनचे २ संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांमध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या उजव्या हाता-पायाच्या नखांमध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. या साधिकेच्या तुलनेत दोन्ही संतांच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक आहे.

२. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या नखांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण

व्यक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. आताच्या कलियुगात व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असल्याने तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. व्यक्तीने साधना करणे आरंभ केल्यावर तिच्यातील रज-तमाचे प्रमाण हळूहळू न्यून होऊन तिच्यातील सत्त्वगुण वाढू लागतो. जसजशी व्यक्तीची साधना वाढते, तशी तिच्यामध्ये सात्त्विकता निर्माण होते. तिच्यातील सात्त्विकतेमुळे तिच्या देहातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीची त्वचा, केस, नखे यांवर होऊन तेही चैतन्याने भारित होतात. वरील सारणीतून याचाच प्रत्यय आला. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि साधिका यांना असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासामुळे त्यांच्या नखांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. जसजशी त्यांची साधना वाढेल, तसतसा त्यांचा त्रास अल्प होऊन त्यांच्यामध्ये सात्त्विकता निर्माण होईल.

सौ. मधुरा कर्वे

३. संतांच्या हाता-पायांच्या नखांमध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण

संतांमध्ये सत्त्वगुण अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे संतांमध्ये चैतन्य असते. (कै.) पू. माईणकर आणि पू. मेनरायआजोबा हे ‘संत’ असल्याने त्यांच्यामध्ये चैतन्य आहे. त्यांच्यातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या नखांवर होऊन ती चैतन्याने भारित झाली आहेत.

४. संतांच्या हातांपेक्षा त्यांच्या पायांच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असण्याचे कारण

अन्य अवयवांच्या तुलनेत संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पायांच्या बोटांच्या नखांवर होऊन ती चैतन्याने भारित होतात.

५. संतांच्या डाव्या हाता-पायापेक्षा त्यांच्या उजव्या हाता-पायाच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असण्याचे कारण

शरिराची डावी बाजू चंद्रनाडीशी आणि उजवी बाजू सूर्यनाडीशी संबंधित आहे. चंद्रनाडी शीतल आणि सूर्यनाडी प्रखर (तेजस्वी) आहे. सूर्यनाडी प्रखर असल्यामुळे डाव्यापेक्षा उजव्या बाजूकडील अवयवांमध्ये थोडी अधिक शक्ती आहे.

थोडक्यात ‘व्यक्तीची आध्यात्मिक पातळी जेवढी अधिक तेवढे तिच्यामध्ये चैतन्य अधिक असते आणि तिच्यातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम तिच्या नखांवर होतो’, हे लक्षात येते.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांमध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व आहे आणि ते जागृत होऊन कार्यरत झाले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीमुळे त्यांच्याकडून वातावरणात उच्च स्तरीय चैतन्य प्रक्षेपित होते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या हाता-पायांच्या नखांवर होऊन तीही चैतन्याने भारित झाली आहेत.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१२.८.२०२३)

इ-मेल : [email protected]

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.