मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देहली भेटीवर
पणजी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात ३७ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह गोव्यात विविध उपक्रम राबवणे, यांसाठी केंद्र सरकार गोवा सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २५ ऑगस्ट या दिवशी नवी देहली येथे गोव्यातील विविध विकासकामांविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देहली भेटीच्या वेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचीही भेट घेतली.
#WATCH | Delhi | Goa CM Dr Pramod Sawant speaks on his meetings with Union Ministers Nirmala Sitharaman, Anurag Thakur, Jyotiraditya Scindia and Defence Minister Rajnath Singh. pic.twitter.com/QhrRkrDbDn
— ANI (@ANI) August 25, 2023
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घेतली भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देहली येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली. या भेटीत गोव्याशी निगडित नागरी उड्डाण विभाग आणि पर्यटन क्षेत्र यांसंबंधी चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांचीही उपस्थिती होती. गोव्याच्या शिष्टमंडळाने या भेटीच्या वेळी दाबोळी विमानतळाचा प्रश्न केंद्रीय त्यांच्याकडे मांडला. यावर शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नसल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
मंत्री मावीन गुदिन्हो यांनी घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट
गोव्यात नौदलाचा ‘बफर झोन’ ५० मीटर एवढा न्यून करण्याची मागणी
(‘बफर झोन’ म्हणजे मोकळी जागा)
पणजी – पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी देहली भेटीच्या वेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील नागरिकांना नौदलाच्या संरक्षक कठड्यापासून असलेल्या मोकळ्या जागेत बांधकामासाठी ‘ना हरकत दाखला’ देण्यास नौदल सतावणूक करत असल्याचा आरोप केला. या मोकळ्या जागेचे क्षेत्र न्यून करून ते नौदलाच्या संरक्षक कठड्यापासून ५० मीटर अंतरापर्यंत निश्चित करावे, अशी मागणी पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी या वेळी केली.