नवी मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – अश्वमेध यज्ञ म्हणजे सूक्ष्म जगतात देवतत्त्वाची वृद्धी करण्याचा प्रयोग आहे. या निमित्ताने समाजात जे चांगले लोक आहेत, त्यांना संघटित करणे, त्यांना समाजनिर्मितीच्या कार्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. समाजात चांगली व्यवस्था उभी करायची आहे. समाजाला काय आवश्यक आहे ?, हे ऋषिमुनींनी सांगितलेले आहे. ते ज्ञान समजण्यासाठी अनेक जन्म लागतील. पैकी एक ज्ञान म्हणजे यज्ञ. तो विश्वाचे वातावरण शुद्ध करतो. या वातावरणातून आसुरी तत्त्व समाप्त करून देवतत्त्वाची वृद्धी करणे. यामुळे प्रत्येक मनुष्यात चांगले काम करण्याची इच्छा निर्माण होईल. अशा प्रकारे यज्ञाचे विज्ञान वातावरणाला परिवर्तित करते, असे प्रतिपादन हरिद्वार येथील गायत्री परिवाराच्या मुख्यालयातील श्री. मंगल सिंह गढवाल यांनी केले.
‘सनातन संस्थे’च्या वतीने सानपाडा येथे २२ आणि २३ ऑगस्ट या दिवशी सनातनच्या साधकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘साधनावृद्धी आणि साधक निर्मिती’ या २ दिवसांच्या शिबिराच्या वेळी दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. सनातन संस्थेच्या सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती, तसेच मार्गदर्शनही साधकांना शिबिरात लाभले.
२३ जानेवारी २०२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत खारघर येथे अश्वमेध यज्ञ !
गायत्री परिवार, महाराष्ट्र – गोवा झोनचे प्रभारी श्री. मनुभाई पटेल यांची सानपाडा येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार आणि सनातन संस्थेच्या सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांना ‘सनातन आश्रमा’ची पुस्तिका भेट देण्यात आली, तसेच सनातन संस्था करत असलेल्या संशोधनाविषयीही श्री. पटेल यांना सांगण्यात आले.
श्री. पटेल यांनी ‘अश्वमेध महायज्ञा’ची पुस्तिका भेट देत सनातन संस्थेला या यज्ञाच्या कार्यक्रमास निमंत्रित केले. २३ जानेवारी २०२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत सेंट्रल पार्क मैदान, सेक्टर – २९, खारघर ( प.), नवी मुंबई येथे अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.