ब्रिक्स’ संघटनेत आणखी ६ देशांचा समावेश होणार !

डावीकडून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा आणि नरेंद्र मोदी

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ५ देशांच्या ‘ब्रिक्स’ (बी.आर्.आय.सी.एस्.) संघटनेमध्ये आता आणखी ६ देशांंचा समावेश करण्यात येणार आहे. येथे चालू असलेल्या १५व्या ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. १ जानेवारी २०२४ पासून इराण, अर्जेंटिना, इथियोपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे या संघटनेतील देशांची संख्या ११ होणार आहे. नवीन सहभागी होणारे देश निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत. या देशांच्या समावेशानंतर ‘ब्रिक्स’चे नाव पालटून ‘ब्रिक्स प्लस’ करण्यात आले आहे.
४० किंवा त्याहून अधिक देश ब्रिक्स संघटनेत सहभागी होऊ इच्छित आहेत. या देशांचा समावेश करायचा कि नाही ?, यावर ब्रिक्स परिषदेत चर्चा झाली. त्यानंतर वरील ६ देशांचा समावेश करण्यात आला. भारत आणि रशिया यांच्या समर्थनामुळे त्यांचा समावेश करण्यात आला. काही चीनसमर्थक देशांना सहभागी करून घेण्यास मात्र नकार देण्यात आला.