गोवा : गांजे येथील श्री शांतादुर्गा आणि श्री गांजेश्वरी या मंदिरांमध्ये चोरी !

अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरला !

फोंडा, २० ऑगस्ट (वार्ता.) – गांजे येथील श्री शांतादुर्गा आणि श्री गांजेश्वरी मंदिरांमध्ये २० ऑगस्ट या दिवशी पहाटे चोरी झाली. गांजे येथून बोंडला अभयारण्यात जाणार्‍या रस्त्याच्या अर्धा कि.मी. आत ही दोन्ही मंदिरे आहेत. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील पैशांसह एकूण अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरला. मंदिरात तिसर्‍यांदा चोरीची घटना घडल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. दोन्ही मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक अन्वेषण चालू आहे.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट या दिवशी सकाळी राजाराम गावकर हे देवदर्शनाला आले असतांना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. दोन्ही मंदिरांत मिळून एकूण ६ मोठ्या घंटा, ४ समया आणि इतर पूजेच्या पितळ्याच्या वस्तू मिळून एकूण अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज, तसेच दोन्ही मंदिरांतील दानपेट्यांतील मिळून सुमारे २५ सहस्र रुपये चोरट्यांनी पळवले. ओटी भरतांना अर्पण केलेल्या साड्या, देवीची प्रभावळ, स्टीलचे पूजेचे साहित्य आणि इतर वस्तू चोरट्यांनी नेल्या नाहीत. दानपेट्या उलट्या करून त्यातील पैसे चोरट्यांनी काढले. या मंदिरांत यापूर्वी १० वर्षांपूर्वी आणि ६ वर्षांपूर्वी, अशा २ वेळा चोरी झाली होती.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

संपादकीय भूमिका

गोव्यातील मंदिरे अजून असुरक्षितच !