राष्‍ट्राची आध्‍यात्मिक प्रगती हवी !

भारतात हिंदूंना सुरक्षित आणि शांततामय जीवन जगण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणे आवश्‍यक !

१५ ऑगस्‍ट या दिवशी देशाच्‍या ७७ व्‍या स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्‍ल्‍यावरून दिलेल्‍या भाषणात देशात परिवर्तन घडवून आणण्‍याचे देशवासियांना वचन दिले. त्‍यांनी सशक्‍त, भ्रष्‍टाचारमुक्‍त आणि विकसित देशाच्‍या निर्माणाचा वज्रनिर्धार व्‍यक्‍त केला. ‘‘वर्ष २०४७ पर्यंत देशाची ‘विकसित राष्‍ट्र’ म्‍हणून ओळख निर्माण करायची असून त्‍यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्‍पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. भ्रष्‍टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या ३ वाईट प्रवृत्तींमुळे देशाचा विकास खोळंबला होता. भ्रष्‍टाचाराच्‍या वाळवीने देशातील सर्व व्‍यवस्‍थांना पोखरून टाकले आहे. तुमचे अधिकार हिरावून घेतले आहेत. आता भ्रष्‍टाचारमुक्‍तीची नवी स्‍वच्‍छता मोहीम राबवली जात आहे. भ्रष्‍टाचार नष्‍ट करण्‍याचे मी वचन दिले आहे, त्‍यासाठी मी लढत राहीन’’, असे मोदी म्‍हणाले.

राजकारणाचे अध्‍यात्‍मीकरण आवश्‍यक !

नरेंद्र मोदी यांनी देशाच्‍या विकासासाठी वरीलप्रमाणे केलेला संकल्‍प निश्‍चितच उत्‍कृष्‍ट आहे; मात्र आजपर्यंत ज्‍या देशांनी वैज्ञानिक आणि भौतिकतेच्‍या आधारे देशाची प्रगती साध्‍य करण्‍याचा प्रयत्न केला, त्‍या बहुतांश देशांना भ्रष्‍टाचार, घराणेशाही, वंशभेद, अशा विविध कारणांमुळे देशाचा खर्‍या अर्थाने विकास साधता आला नाही. अनेक देशांत भ्रष्‍टाचार आणि गुन्‍हेगारी यांच्‍या विरोधात कडक कायदे असतांनाही या दोन्‍ही गोष्‍टी अल्‍प झालेल्‍या नाहीत, उलट गुन्‍हेगारी आणि भ्रष्‍टाचार यांच्‍या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. परदेशात दिवसाढवळ्‍या शाळेतील मुले, मॉलमधील लोक आणि इतर ठिकाणी गोळीबार अन् चाकूद्वारे आक्रमण करून माणसे अन् लहान मुले यांची हत्‍या करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे अशा विविध कारणांचा शोध घेतला असता समाजात राजकारण आणि समाजकारण पुष्‍कळ प्रमाणात झाले आहे; तथापि समाज अन् राजकारणाचे अध्‍यात्‍मीकरण न झाल्‍याने समाजाची खर्‍या अर्थाने प्रगती झालेली नाही, तर समाज दिशाहीन झालेला आहे. भारताची प्रगती होण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणे आवश्‍यक आहे. अमेरिका, जपान, चीन, ऑस्‍ट्रेलिया, फ्रान्‍स, सिंगापूर, रशिया अशा अनेक देशांत विज्ञानाने भौतिक सुख उपलब्‍ध करून दिले; मात्र खरी मानसिक शांती, आनंद आणि आनंदी समाज मिळवून दिला आहे का ? एखादा रोबोट (मानवी यंत्र) जसा वागतो, त्‍याप्रमाणे विज्ञानाने भ्रमणभाष, संगणक, दूरदर्शन संच (टीव्‍ही), वैज्ञानिक उपकरणे, सामाजिक माध्‍यमे यांद्वारे मानवाचे यांत्रिकीकरण केले आहे. आज समाजात लव्‍ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, महिलांवरील अत्‍याचार, भ्रष्‍टाचार, संस्‍कृतीचा र्‍हास, देवतांचे विडंबन, मंदिरांची तोडफोड, हिंदूंच्‍या हत्‍या अशा अनेक गोष्‍टी घडत आहेत. त्‍यामुळे या विकृती संपल्‍याविना देशाची खर्‍या अर्थाने प्रगती करता येणार नाही. या विकृती संपवण्‍यासाठी समाजात धर्म आणि अध्‍यात्‍म यांचा प्रसार केला पाहिजे. समाजातील प्रत्‍येक गोष्‍टीला अध्‍यात्‍माची जोड दिली पाहिजे. संस्‍कृतीचे संवर्धन आणि शिक्षण, धर्मशिक्षण, धर्मप्रसार, संतांचे सत्‍संग, गुरुकुल शिक्षणव्‍यवस्‍था निर्माण केल्‍यानंतर समाजातील लोकांमध्‍ये सात्त्विकता वाढून आपोआपच भ्रष्‍टाचार अन् गुन्‍हेगारी यांचे प्रमाण नष्‍ट होऊ शकते. तथापि या दृष्‍टीने आजचे बहुतांश शासनकर्ते विचार करत नाहीत, तर ते केवळ विज्ञानाच्‍या आधारे समाजाच्‍या प्रगतीचा विचार करत असल्‍याने समाज रसातळाला गेला आहे. भ्रष्‍टाचार, लव्‍ह जिहाद, महिलांवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात कठोर कायदेच न बनवल्‍यामुळे समाजातील भ्रष्‍टाचार कधीही संपलेला नाही, ना महिलांवरील अत्‍याचार. मग राष्‍ट्राचा विकास कसा होणार?

हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वाचा प्रश्‍न !

गेल्‍या अनेक वर्षांपासून प्रभावशाली धर्मगुरु आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना दीर्घकाळापासून हिंदु राष्‍ट्राची मागणी करत आहेत; मात्र वर्तमान काळात विशेषतः नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्‍यानंतर ही मागणी अधिकच वाढली आहे. पुरीचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती यांनी ‘भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित केले पाहिजे’, अशी मागणी देहली येथील तालकटोरा इनडोअर स्‍टेडिअममध्‍ये केली होती. ‘भारताने स्‍वतःला हिंदु राष्‍ट्र घोषित करताच इतर १५ देशसुद्धा स्‍वतःला हिंदु राष्‍ट्र घोषित करतील’, अशी आशाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली होती. केंद्रात दुसर्‍यांदा मोदी सरकारच्‍या स्‍थापनेनंतर काश्‍मिरी हिंदूंच्‍या पुनर्वसनाच्‍या दृष्‍टीने कलम ३७० रहित करणे, नागरिकत्‍व सुधारणा कायदा (‘सीएए’), सर्वोच्‍च न्‍यायालयाने राममंदिराच्‍या बाजूने दिलेला ऐतिहासिक निर्णय आणि आता राममंदिराचे बांधकाम अशा सर्व सकारात्‍मक गोष्‍टी घडत आहेत. ‘सेक्‍युलर’ पक्षांची सत्ता असणार्‍या राज्‍यांत ‘सीएए’ कायदा लागू न करण्‍याचा निर्णय घेणे आणि हिंदूबहुल भारतात पीडित हिंदूंना न्‍याय मिळू न शकणे’, हा लोकशाहीचा पराभव आहे, असे म्‍हणायचे का ? मणीपूर, हरियाणा, राजस्‍थान, महाराष्‍ट्र यांसह इतर राज्‍यांत धर्मांधांचा वाढलेला उद्दामपणा, दंगली, हिंदु नेत्‍यांच्‍या हत्‍या, हिंदूंवर वाढत चाललेला अत्‍याचार, धर्मांतर, लव्‍ह जिहादच्‍या घटना थांबवण्‍यासाठी नरेंद्र मोदी यांनी ठोस प्रयत्न आणि कायदे करणे आवश्‍यक आहे. हे सत्तेत असतांनाच करणे शक्‍य आहे. वर्ष २०११ च्‍या जनगणनेनुसार ‘वर्ष २०६१ मध्‍ये भारतात हिंदू अल्‍पसंख्‍य होतील’, अशी स्‍थिती आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदूंना त्‍यांचे न्‍याय्‍य हक्‍क मिळण्‍यासाठी भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करणे आवश्‍यक आहे. नरेंद्र मोदी धार्मिक आहेत. त्‍यांनी सत्तेच्‍या माध्‍यमातून संपूर्ण समाजाला धार्मिक बनवणे, भारतातील हिंदूंना अपेक्षित आहे. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी पूर्ण शक्‍ती लावण्‍याची हीच योग्‍य वेळ आहे. समाजातील हिंदूंची स्‍थिती पहाता हिंदूंनी भारताला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी त्‍याग केला नाही, तर हिंदूंचे अस्‍तित्‍वच संकटात येईल. हिंदू अल्‍पसंख्‍य होतील. नरेंद्र मोदी यांनी भाषणात केलेल्‍या सर्व गोष्‍टी प्रत्‍यक्षात कृतीत, आचरणात आणायच्‍या असतील, तर त्‍यांनी भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करून भारत हिंदु राष्‍ट्र घोषित करणे आवश्‍यक आहे !