इतिहासाचा विपर्यास करणारे आणि स्‍वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणारे ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे !

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्‍या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कार विजेते आणि ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे यांनी भारताचा इतिहास अन् हिंदु धर्म यांविषयी अतिशय संतापजनक अशी वक्‍तव्‍ये केली. खरेतर अतिशय जुना इतिहास असलेल्‍या या संस्‍थेच्‍या व्‍यासपिठावरून अशा प्रकारची वक्‍तव्‍ये करणे अतिशय चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्‍य टिळक असे महापुरुष असलेल्‍या भारतातील अतिशय जुन्‍या संस्‍थांपैकी ही एक संस्‍था आहे. खरेतर ग्रंथ संग्रहालयाच्‍या रौप्‍य महोत्‍सवासारख्‍या प्रसंगी मांडलेले हे विषय कार्यक्रमाच्‍या विषयाला धरून नाहीत. केवळ हिंदु धर्म आणि इतिहास यांना ‘लक्ष्य’ करण्‍यासाठी शोधलेले ते एक निमित्त आहे; परंतु एका ज्‍येष्‍ठ साहित्‍यिकाने अशा प्रकारे कोणतेही संदर्भ न देता केलेली वक्‍तव्‍ये चुकीचीच म्‍हणावी लागतील.

स्‍वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणारे ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे !

१. भालचंद्र नेमाडे यांच्‍याकडून इतिहासाचा विपर्यास केली जाणारे वक्‍तव्‍ये आणि त्‍याचे खंडण

नेमाडे यांनी भाषणाच्‍या प्रारंभीच सांगितले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्‍वराज्‍य इंग्रजांच्‍या हवाली केले. सगळ्‍या पेशव्‍यांमध्‍ये फक्‍त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते. बाकीच्‍यांची राजवट जुलमी होती.’ इथे सगळ्‍यात महत्त्वाचा प्रश्‍न हा येतो, ‘पेशव्‍यांना राज्‍य दुसर्‍या सत्तेच्‍या हवाली करण्‍याचे अधिकार होते का ? कारण राज्‍य तर छत्रपतींचे होते आणि पेशवे सेवक होते. त्‍यामुळे पेशव्‍यांनी राज्‍य कुणाला देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.’ त्‍यांनी त्‍यातच पुढे सांगितले, ‘नानासाहेब पेशवे सत्तेवर असतांना लहान मुली मागवत असत. तशी पत्रे आहेत.’ जर असे असेल, तर ‘त्‍यांना छत्रपती शाहूंनी याविषयी प्रश्‍न कसा विचारला नाही ?’ थोरले बाजीराव पेशवे यांच्‍या निधनानंतर अतिशय विश्‍वासाने ‘ज्‍या नानासाहेबांकडे पेशवाईची धुरा प्रत्‍यक्ष छत्रपतींनी सोपवली, त्‍यांच्‍या निवडीवर या ठिकाणी संशय घेतला गेला’, असेच म्‍हणावे लागेल; कारण जर खरच असे काही घडले असते, तर निश्‍चितच शाहू महाराजांनी नानासाहेबांना शिक्षा केली असती आणि त्‍यांची पेशवाई कायमसाठी रहित केली असती.

यात ते पुढे म्‍हणतात की, येथील जुलमी राजवटीला धडा शिकवण्‍यासाठी इंग्रज या ठिकाणी आले. खरेतर हा दावा अतिशय हास्‍यास्‍पद म्‍हणावा लागेल. जर इंग्रज भारताच्‍या कल्‍याणासाठी आले असतील, तर मग येथे नवी व्‍यवस्‍था लावून ते निघून का गेले नाहीत ? पुढे १५० वर्षे राज्‍य करून या देशाला पारतंत्र्यात खितपत ठेवायची काय आवश्‍यकता होती, हेही नेमाडे यांनी स्‍पष्‍ट केले पाहिजे. नेमाडे यांनी असेही म्‍हटले आहे, ‘मोगल बादशहांच्‍या वेळी हिंदु-मुसलमान हा भेद नव्‍हता.’ मग ‘मोगलांनी हिंदूंवर लादलेला जिझिया कर आणि त्‍यांनी केलेल्‍या हिंदूंच्‍या कत्तली हे कशाचे उदाहरण आहे ?’, हेही त्‍यांनी सांगावे.

कु. अन्नदा मराठे

२. औरंगजेबाने त्‍याच्‍या २ राण्‍यांना हिंदु धर्मानुसार वागण्‍याची अनुमती दिली होती का ?

यानंतर नेमाडे यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आणि प्रत्‍येक हिंदूला संताप आणणारे एक विधान केले. ते म्‍हणजे ‘काशीविश्‍वेवरच्‍या मंदिरात बलात्‍कार होत असत. औरंगजेबाच्‍या २ राण्‍या काशीविश्‍वेवरच्‍या दर्शनाला गेल्‍या असतांना त्‍यांच्‍यावर पुजार्‍यांकडून मंदिरात बलात्‍कार करण्‍यात आले. त्‍यामुळे औरंगजेबाने चिडून ते मंदिर पाडले. अशा प्रकारांसाठी मंदिरामध्‍ये पुजार्‍यांनी भुयार खणलेले होते.’ यासाठीही त्‍यांनी कुठला संदर्भ दिलेला नाही; पण नेमाडे यांनी हे स्‍पष्‍ट केले पाहिजे की, जरी औरंगजेबाच्‍या राण्‍या हिंदु असल्‍या, तरी त्‍यांना हिंदु धर्मानुसार वागण्‍याची सूट औरंगजेबाने दिली होती का ? दुसरे म्‍हणजे एका बादशाहच्‍या पत्नींशी असे वर्तन करण्‍याचे कुणाचे धाडस होईल का ? सगळ्‍यात महत्त्वाचे म्‍हणजे त्‍या वेळेला त्‍या राण्‍यांसह असलेले सैनिक काय करत होते ? कारण राण्‍या एकट्याच मंदिरात गेलेल्‍या नसतील, त्‍यांची सुरक्षाव्‍यवस्‍था काय करत होती ?

३. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी धादांत खोटा इतिहास सांगणारे नेमाडे !

यापुढे जाऊन नेमाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची माहिती दिली. त्‍यांनी महाराजांचा एकेरी उल्लेखही केला. त्‍या वेळी व्‍यासपिठावर उपस्‍थित असलेले शरद पवार किंवा इतर कुणीही याला विरोध केला नाही. भालचंद्र नेमाडे म्‍हणाले, ‘‘शिवाजी महाराजांचे मुख्‍य सेनापती मुसलमान होते. त्‍यांचा सर्वाधिक विश्‍वास हा हिंदु सरदारांच्‍या ऐवजी मुसलमान सरदारांवर होता’’; पण मग ‘प्रतापराव गुजर आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते हे नक्‍की कोण होते ?’, याविषयी त्‍यांनी माहिती दिली पाहिजे. अशा प्रकारचा धादांत खोटा इतिहास सांगण्‍याची आवश्‍यकता काय ? हे मात्र समजत नाही.

४. सतीची चाल औरंगजेबाने बंद केली, असे म्‍हणणे हे हास्‍यास्‍पदच !

यानंतर नेमाडे यांनी आणखी एक हास्‍यास्‍पद दावा केला, तो म्‍हणजे सतीची चाल औरंगजेबाने बंद केली ! याचे संदर्भ त्‍यांनी कुठे शोधले ? हे सुद्धा सांगायला हवे. खरे म्‍हणजे सतीची प्रथा हिंदु धर्मात नाही. ती काही काळापुरती एक सामाजिक प्रथा होती. त्‍याला परकीय आक्रमणांमुळे धोक्‍यात आलेली स्‍त्रियांची सुरक्षा हे सर्वांत महत्त्वाचे कारण होते. ती नंतर बंदही झाली; पण ‘ती औरंगजेबाने बंद केली’, असे म्‍हणणे खरोखरच विनोदी आहे.

५. ‘पृथ्‍वी गोल आहे’, हे संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरांच्‍या पूर्वीपासून हिंदूंना ठाऊक असणे

पुढे ते म्‍हणतात, ‘नाना फडणवीसांकडे एक माणूस आला होता. त्‍याने नाना फडणवीसांना पृथ्‍वी गोल आहे, हे सांगितल्‍यावर त्‍यांनी ते नाकारले’; पण आपल्‍या ग्रंथांमध्‍ये स्‍पष्‍ट लिहिले आहे की, विष्‍णूच्‍या वराह अवतारामध्‍ये त्‍याने धारण केलेली पृथ्‍वी ही गोल आहे. इतकेच नाही, तर ‘पृथ्‍वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्‍वीभोवती फिरत नाही’, हेही आपल्‍या पूर्वजांना ठाऊक होते. संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराजांनी ‘ज्ञानेश्‍वरी’त त्‍याविषयी उल्लेख केलेला आहे. मग उगीचच कारण नसतांना आपण आपल्‍यालाच न्‍यून का लेखायचे ?

६. हिंदूंनीच कृतीप्रवण होणे आवश्‍यक !

खरेतर ज्‍येष्‍ठ लेखकांकडून अशा पद्धतीची विधाने ही स्‍वीकारण्‍याजोगी नाहीत. सतत आपला देश, ज्ञान, हिंदु धर्म यांना न्‍यून लेखणे, ‘आपण मूर्ख होतो’, असे म्‍हणणे हे कधीपर्यंत चालणार ? ‘आपल्‍याला संस्‍कृती मिळाली ती मोगलांकडून आणि ज्ञान मिळाले ते इंग्रजांकडून’, असे आपण कधीपर्यंत म्‍हणत रहाणार ? जर समाजातील प्रतिष्‍ठित म्‍हणवणारे असे म्‍हणणार असतील, तर मग समाजाने कुणाकडे पहायचे ? आणि अशा गोष्‍टींना जर विरोध होणार नसेल, तर ते सर्वाधिक चुकीचे आहे. आपला समाज आणि सरकार यांच्‍याकडून या गोष्‍टींना विरोध व्‍हायला हवा. सरकारने याविरोधात कठोर कारवाई करायला हवी. आता हिंदूंनीच यावर विचार आणि कृती करण्‍याची आवश्‍यकता नक्‍कीच निर्माण झाली आहे. नाही तर हिंदु धर्माविषयी आणि संस्‍कृतीविषयी आपल्‍याच धर्मातील लोकांचे गैरसमज कधी दूर होणार नाहीत !

– कु. अन्‍नदा विनायक मराठे, दापोली, रत्नागिरी (९.८.२०२३)