नीलिमाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्याच समवेत ! – आमदार भास्कर जाधव
चिपळूण, ८ ऑगस्ट (वार्ता.) – तालुक्यातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे दायित्व पार पाडत आहे. माझ्या परीने शासकीय यंत्रणा कार्यरत होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नीलिमाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्याच समवेत असेन, अशी शाश्वती ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी नीलिमाला न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या वेळी आमदार जाधव यांनी नीलिमा चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. ओमळी हायस्कूलमधील शोकसभेत त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी परिसरांतील गावांतील ग्रामस्थही उपस्थित होते.
दुसरी नीलिमा होऊ नये यासाठी सतर्क होऊन लढा उभारूया ! – शोकसभेला उपस्थितांचे मत
आता काहीही झाले तरी दडपशाही विरुद्ध आवाज उठवायचाच. आपण दुसरी नीलिमा होऊ नये यासाठी सतर्क होऊन लढा उभारला पाहिजे, असे मत शोकसभेला उपस्थित असलेल्या अनेक महिला, पुरुष आणि तरुणांनी व्यक्त केले. नीलिमाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी दिली.
या प्रकरणी पोलीस यंत्रणा कसून शोध घेत आहे. सत्य समोर येईपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आमदार यांना निवेदन देऊ. त्यानंतर पुढील कठोर निर्णय घेऊ, असे ठरवून या शोकसभेची सांगता झाली.
शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ! – माजी आमदार सदानंद चव्हाण
चिपळूण – नीलिमा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पदाधिकार्यांसह चव्हाण कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या वेळी शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत चाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मान्यवरांनी नीलिमाच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
सकल हिंदु समाज, लांजा यांच्याकडून प्रशासनाला निवेदन – नीलिमा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी करा !
लांजा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – ओमळी येथील नीलिमा चव्हाण या प्रथम बेपत्ता आणि नंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हा घातपात आहे. कु. चव्हाण यांच्या मृतदेहाची स्थिती पाहून त्यांच्यावर अतीप्रसंग झाल्याचे जाणवत आहे. त्या दृष्टीने या प्रकरणाचे वरिष्ठ यंत्रणांकडून अन्वेषण होणे आवश्यक आहे. तरी या प्रकरणाची कसून चौकशी करून चव्हाण कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे निवेदन येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले. हे निवेदन लांजा तहसीलदार कार्यालयात अव्वल कारकून महादेव चव्हाण यांनी स्वीकारले.