विकारांना आळा घालण्‍याचे उपाय

‘सूर्योदयापूर्वी स्नान करून पूर्वाभिमुख बसा. धरतीला नमन करून प्रार्थना करा, ‘हे वसुंधरे ! जशी तू अचल आहेस, तसाच माझा निर्णय अचल व्‍हावा आणि आसन अचल व्‍हावे.’ मग गुरुदेवांचे स्‍मरण करून त्‍यांच्‍याशी थोड्या स्नेहाच्‍या गोड गोष्‍टी करा. दीर्घ, खोल ५-१५ श्‍वास घ्‍या आणि ‘हरि ॐ…’ चे गुंजन करत मानसिक रूपाने तुमच्‍या दुर्बलता आणि विकार यांना समोर आणा. ज्‍यांच्‍यामुळे तुमचे पतन होते, त्‍या विचारांना आणि कर्मांना समोर आणा, ज्‍यांच्‍यामुळे तुम्‍ही निस्‍तेज होता, मग त्‍यांना ॐकार किंवा मंत्र यांच्‍या गुंजनाने, जपाने पायदळी तुडवत जा. जर शरिराने वारंवार आजारी पडत असाल, तर श्‍वास घ्‍या आणि संकल्‍प करा, ‘मी आता निरोगी राहीन ! हरि ॐ ॐ ॐ…’ शरिराच्‍या व्‍याधींचे चिंतन करून दीर्घ स्‍वरात ‘हरि ॐ’ची गदा मारून त्‍या व्‍याधींची मुळे उपटून टाका. नंतर थोडा फार बाह्य उपचार करून त्‍यांच्‍या फांद्या आणि पानेसुद्धा नष्‍ट करा. जर मनाची व्‍याधी असेल – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्‍सर, अहंकार असले, हे बहुधा असतातच,तर जी व्‍याधी ज्‍याला जास्‍त असेल, त्‍या व्‍याधीचे स्‍मरण करत दीर्घ श्‍वास घेऊन त्‍या व्‍याधींवर ॐकाराचे, गुरुमंत्राचे दीर्घ स्‍वरात उच्‍चारण करून त्‍याच मंत्राने मोठ्याने प्रहार करा. जर अशी जागा असेल की, जेथे गुरुमंत्र दुसरे लोक ऐकू शकतात, तर केवळ ‘हरि ॐ… हरि ॐ…’चे दीर्घ उच्‍चारण करून अथवा मनोमन गुरुमंत्राचा जप करून त्‍या विकारांना, व्‍याधींना तुडवा. सहस्रो वेळा प्रयत्न करा. असफल झाला, तर घाबरू नका. जितके-जितके संस्‍कार खोलवर (दृढ) आहेत, तितका-तितका पुरुषार्थ दृढ पाहिजे.’

जो भाग्‍याच्‍या भरवशावर बसून रहातो, त्‍याला तर रडावेच लागते. आजचा पुरुषार्थ उद्याचे भाग्‍य आहे. काल केलेले कर्म आजचे भाग्‍य बनते. पूर्वीचे चांगले कर्म आहे; परंतु आता पुरुषार्थ नसेल आणि तुच्‍छ संग असेल, तर पूर्वीची भक्‍ती अन् ज्ञान दबून जाते. पूर्वीचे चांगले कर्म आहे आणि आताही पुरुषार्थ करत असाल, तर  भक्‍ती अन् ज्ञान विकसित होऊ लागतात. जसजशी भक्‍ती वाढते, ज्ञान विकसित होते, तसतसा मनुष्‍य सदाचारी होतो. जसजसा मनुष्‍य सदाचारी होतो, तसतसे ज्ञान आणि भक्‍ती चांगले  होतात.

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०१९)