‘आय.आय.टी.’साठी लवकरच कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ३१ जुलै (वार्ता.) – गोव्यात ‘आय.आय.टी.’साठी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी – भारतीय तंत्रज्ञान संस्थासाठी) कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. ‘आय.आय.टी.’ प्रकल्प सरकारच्या भूमीत उभारण्यासही काही जण विरोध करत आहेत. सरकार प्राधान्याने लवकरात लवकर या प्रकल्पासाठी जागा निश्चित करणार आहे, असे आश्वासन शिक्षणमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणासंबंधी अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना दिले. भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारला गेली १० वर्षे ‘आय.आय.टी.’साठी कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करण्यास अपयश आल्याचे सांगितले. सरकारने काही नागरिकांच्या विरोधाला न जुमानता गोमंतकियांच्या हितासाठी गोव्यात ‘आय.आय.टी.’ प्रकल्पाला कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेली इतर सूत्रे

१. महाविद्यालयात उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरकारने महाविद्यालय संकुलात येऊन उमेदवार निवडण्याची (कॅम्पस् सिलेक्शन) संधी उपलब्ध केली आहे.

२. विद्यार्थ्यांसाठीची माध्यान्ह आहार योजना ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, या हेतूने चालू केलेली आहे आणि ही योजना स्वयंसाहाय्य गटांसाठी केलेली नाही. माध्यान्ह आहार पुरवणार्‍या स्वयंसाहाय्य गटांना मिळणारा मोबदला दुप्पट करण्यात आला आहे.

३. पालकांकडून देणगी स्वीकारणे अयोग्य ! सर्व अनुदानित शाळांना सरकारकडून निधी मिळत असूनही अनेक ठिकाणच्या शाळा पालकांकडून देणगी स्वीकारत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे; मात्र याविषयी कुणीही समोर येऊन बोलण्याचे धाडस करत नाही. अनुदानित शाळांना देणगी देणे, चुकीचे आहे.

४. ३ शैक्षणिक शाखांसाठी नवीन इमारती उभारणार सरकार पुन्हा एकदा ‘गोवा सार्वजनिक सेवा आयोग’सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्वसिद्धतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालू करणार आहे. ‘फार्मसी’ शाखा, स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) आणि कला महाविद्यालय यांच्यासाठीच्या नवीन इमारतींची लवकरच पायाभरणी करण्यात येणार आहे.’’