विरोधी गटातील ७ आमदारांचे गोवा विधानसभेत असभ्य वर्तन !

  • मगोचे आमदार जीत आरोलकर यांना धक्काबुक्की

  • आधी २ दिवसांसाठी निलंबन आणि नंतर २४ घंट्यांनंतर उपस्थित रहाण्यास अनुमती

विरोधकांचे विधानसभेत असभ्य वर्तन !

पणजी, ३१ जुलै (वार्ता.) – मणीपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून करण्यात आलेली चर्चेची मागणी सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळल्याने विरोधी गटातील सातही आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला. शून्य प्रहराच्या वेळी बोलणारे आमदार जीत आरोलकर यांच्याशी विरोधी गटातील सदस्यांनी असभ्य वर्तन केले. आमदार जीत आरोलकर बोलत असतांना त्यांना घेराव घालून धक्काबुक्की करण्यात आली. त्यांचा ध्वनीक्षेपक (माईक) काढून घेऊन त्यांना बोलण्यास प्रतिबंध केला. विधानसभेतील ‘मार्शल’च्या (सभागृहातील सुरक्षा रक्षकाच्या) डोक्यावरील टोपी काढून ती आमदार जीत आरोलकर यांच्या डोक्यावर घातली. आमदार जीत आरोलकर यांच्याकडील टीपण असलेले कागद काढून फेकून देण्यात आले. यानंतर सभापती रमेश तवडकर यांनी मार्शलच्या साहाय्याने विरोधी गटातील सदस्यांना सभागृहातून बाहेर काढले.

विरोधी गटातील आमदारांच्या असभ्य वर्तनामुळे गोवाभर चुकीचा संदेश ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सत्ताधारी गटातील इतर सदस्य यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे ‘विरोधी गटातील आमदारांच्या असभ्य वर्तनामुळे गोवाभर चुकीचा संदेश गेला असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी’, अशी मागणी लावून धरली. सत्ताधारी गटाच्या दबावानंतर सभापती रमेश तवडकर यांनी विरोधी गटातील सदस्य तथा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर, ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, ‘आप’चे आमदार क्रूज सिल्वा, ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा आणि काँग्रेसचे केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांना ३१ जुलै आणि १ ऑगस्ट, असे २ दिवस सभागृहातून निलंबित केले.

विरोधी गटातील सदस्य ३१ जुलै या दिवशी सभागृहात येतांनाच काळे कपडे परिधान करून आले होते. विधानसभेत दुपारी १२.३० वाजता शून्य प्रहर चालू झाल्यानंतर विरोधी गटातील सर्व आमदारांनी मणीपूर घटनेचा निषेध करणारा खासगी ठराव प्रविष्ट करून न घेतल्याबद्दल गदारोळ चालू केला. सभापती रमेश तवडकर यांनी ‘या प्रश्नावर शुक्रवारी चर्चा करता येऊ शकते’, असे विरोधी गटातील आमदारांना सांगितले; मात्र आमदारांनी ते अमान्य करून गदारोळ चालूच ठेवला. प्रारंभी विरोधी गटातील सदस्य त्यांच्या जागेवर मणीपूर येथील घटनेचा निषेध करणारे फलक हातात घेऊन उभे राहिले आणि नंतर त्यांनी सभापतींसमोर हौदात धाव घेतली.

यानंतरही सभापती रमेश तवडकर यांनी विरोधकांना न जुमानता कामकाज चालूच ठेवल्याने विरोधी गटातील सदस्य नाराज झाले. विरोधी गटातील आमदार प्रथम शून्य प्रहराच्या कामकाजात बोलणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ‘मगोप’चे आमदार जीत आरोलकर यांच्याकडे धावले अन् त्यांना बोलण्यास अडथळा आणला.

अशोभनीय वर्तन यापुढे सहन करणार नाही ! – सभापती रमेश तवडकर यांची चेतावणी

पणजी – सभापती रमेश तवडकर ३१ जुलै या दिवशी सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी विरोधकांनी केलेल्या गदारोळाचा उल्लेख करतांना म्हणाले, ‘‘विरोधी गटातील सदस्यांनी ३१ जुलै या दिवशी केलेले असभ्य वर्तन अशोभनीय आहे आणि असे वर्तन यापुढे कदापि सहन करणार नाही.

विरोधी आणि सत्ताधारी गटांतील सदस्य यांच्या विनंतीवरून आमदारांच्या निलंबनामध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. विरोधी गटातील सदस्यांना आधी २ दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले होते; मात्र आता विरोधी गटातील सदस्य २४ घंट्यांनंतर म्हणजेच १ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजल्यानंतर सभागृहात उपस्थित राहू शकतील.’’