लडाख सीमेवर शांतता पुनर्स्थापित होईपर्यंत चीनशी ताणलेले संबंध सामान्य होऊ शकत नाहीत !

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनला सुनावले !

‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे संमेलन

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे संमेलन येथे पार पडले. या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे सुरक्षा सल्लागार वांग यी यांच्यात चर्चा झाली. या वेळी डोवाल यांनी वांग यी यांना ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या असलेल्या स्थितीमुळे आपसांतील विश्‍वास अल्प झाला आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाख सेक्टरमध्ये शांतता पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत आपल्यातील संबंध सामान्य होऊ शकत नाहीत’, अशा शब्दांत सुनावले. या वेळी डोवाल यांनी दोन्ही पक्षांमध्ये विश्‍वास वाढवण्याची आवश्यकताही प्रतिपादित केली. यासह त्यांनी ‘लवकरात लवकर दोन्ही देशांतील संबंध सशक्त आणि स्थिर करून हे देश विकासाच्या रूळावर आले पाहिजे’, असेही म्हटले. सीमावादामुळेच गेल्या ६ दशकांमधील चीन आणि भारत यांच्यातील संबंध सध्या सर्वांत वाईट स्थितीत असल्याचे म्हटले जात आहे. गलवान खोर्‍यात चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे.

१. १४ जुलै या दिवशी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झालेल्या ‘आसियान’ देशांच्या बैठकीच्या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी वांग यी यांची भेट झाली होती.

२. डोवाल पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०२० पासून सीमेच्या पश्‍चिमेकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीमुळे भारत आणि चीन यांच्यातील विश्‍वास अन् नाते सार्वजनिक आणि राजकीय स्तरावर नष्ट झाले आहे. या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याद्वारे द्विपक्षीय संबंधांना सामान्य स्थितीत आणण्यासाठीचे अडथळे दूर केले जाऊ शकतील. भारत आणि चीन यांचे संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहेत.’’

३. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याविषयी माहिती दिली की, आम्ही भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सांगितले की, आपसांत विश्‍वास निर्माण होईल, अशी धोरणे ठरवली पाहिजेत, तसेच आपसांतील सहकार्यावर लक्ष दिले पाहिजे. दोन्ही देशांनी आपापल्या राष्ट्रप्रमुखांकडून देण्यात आलेल्या निर्णयांचे पालन केले पाहिजे. याद्वारे हे स्पष्ट होईल की, चीन आणि भारत हे एकमेकांसाठी संकट नव्हे, तर विकासाच्या संधी निर्माण करत आहेत. चीन भारतसमवेतच विकसनशील देशांना पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय व्यवस्था अधिक न्यायपूर्ण दिशेने नेण्यासाठी सिद्ध आहे.

संपादकीय भूमिका

  • चीन आणि पाकिस्तान यांना शब्दांची भाषा समजत नाही , त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा भारत असे करील, तेव्हाच या समस्या दूर होतील !
  • याखेरीज चीनकडून भारतात सातत्याने होणारी घुसखोरी, भारताविरोधी कारवायांसाठी पाकचा केला जाणारा वापर आदी सूत्रांवरूनही चीनला खडसावणे आवश्यक !