गोवा : कला अकादमीतील रंगमंचाचे छत कोसळल्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ !

विरोधकांनी घोटाळा झाल्याच्या आरोपावरून कामकाज रोखून धरले

पणजी, १८ जुलै (वार्ता.) – कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळल्याच्या प्रकरणाचे पडसाद गोवा विधानसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर उमटले. कला अकादमीचे बांधकाम कोसळल्याने प्रकल्पाच्या नूतनीकरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. विधानसभेचे कामकाज चालू होण्यापूर्वी विरोधकांनी ‘विधानसभेतील प्रश्‍नोत्तर तास वगळून कला अकादमीच्या प्रश्‍नावर चर्चा करावी’, अशी मागणी करणारा स्थगन प्रस्ताव सभापतींसमोर मांडला.

सकाळी ११.३० वाजता विधानसभेच्या प्रश्‍नोत्तर तासाला प्रारंभ झाला. यानंतर विरोधक हातात भ्रष्टाचारविरोधी फलक घेऊन सभापतींच्या आसनासमोर आले. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकोस्टा यांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. सभापती रमेश तवडकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले. विरोधक कला अकादमीच्या प्रश्‍नावर लक्षवेधी सूचनेच्या वेळी विषय मांडून यावर चर्चा घडवून आणू शकतात आणि विधानसभेचा वेळ विरोधकांनी वाया घालू नये, असे सभापती रमेश तवडकर यांनी आवाहन केले; मात्र विरोधक त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. यानंतर ११.४५ वाजेपर्यंत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्यामुळे सभापती रमेश तवडकर यांनी कामकाज अर्धा घंट्यासाठी स्थगित केले.

विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव

यानंतर दुपारी १२.१५ वाजता कामकाजाला पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई पुन्हा कला अकादमीच्या सूत्रावर चर्चा करण्याच्या मागणीवरून सभापतींच्या आसनासमोर आले; मात्र या वेळी त्यांना इतर विरोधी पक्षातील सदस्यांचा पाठिंबा लाभला नाही.

विरोधी गटातील अन्य सदस्य प्रश्‍नोत्तर तास चालू करण्याची मागणी करत जागेवरच बसले. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई प्रश्‍नोत्तर तास संपेपर्यंत म्हणजेच दुपारी १२.३० वाजेपर्यंत सभापतींच्या आसनासमोर हातात फलक घेऊन एकटेच उभे राहिले. यामुळे विरोधकांमध्ये एकी नसल्याचे स्पष्ट झाले. दुपारी १२.१५ वाजता प्रश्‍नोत्तर तासाला प्रारंभ झाला.

दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

विधानसभेत दुपारी १२.३० वाजता शून्य प्रहराच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकदमीच्या बांधकामावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळल्याच्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तराखंड येथील ‘आयआयटी-रूरकी’च्या या त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातूनही या प्रकरणाचे अन्वेषण केले जाणार आहे. याचा अहवाल आल्यावर तो विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभेत पटलावर ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर यावर विधानसभेत सविस्तर चर्चा करता येईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनीही या प्रकरणी श्‍वेतपत्रिका काढणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे.

 (Dr. Pramod Sawant)

कला अकादमीचे प्रकरण पोचले न्यायालयात

कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळल्याचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात पोचले आहे. ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाने या प्रकरणी याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी ७ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे.