देशात नक्षलवाद मागे पडला ! – नक्षलवाद्यांची स्वीकृती

नागपूर – देशात नक्षलवाद मागे पडला आहे, अशी स्वीकृती नक्षलवाद्यांनी प्रथमच दिली. नक्षलवाद्यांनी ‘२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ‘हुतात्मा स्मृती’ आठवडा साजरा करा’, अशी सूचना केली आहे. या निमित्ताने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने २४ पानी दस्ताऐवज प्रसारित केला आहे.

या दस्ताऐवजामध्ये नक्षलवाद्यांनी ‘मागील एका वर्षात देशातील वेगवेगळ्या भागांत ६७ नक्षली कमांडर्स पोलिसां समवेत झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत किंवा आजारपणासह इतर कारणांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नक्षली चळवळीला धक्का बसल्याचे मान्य केले आहे. यासह यापुढे पोलिसांच्या अत्याधुनिक डिजिटल सर्व्हिलंस आणि इंटेलिजन्स यांचा सामना कशा पद्धतीने करायचा? याचीही दिशा यात देण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांच्या दस्ताऐवजात काय म्हटले आहे ?

१. अत्याधुनिक आणि अद्ययावत ‘टेक्निकल इंटेलिजन्स’मुळे पोलीस नक्षली कमांडरपर्यंत पोचून त्यांना अटक करत आहेत किंवा त्यांना ठार मारत आहेत.
२. ‘पोलिसांच्या अत्याधुनिक टेक्निकल इंटेलिजन्सचा सामना करण्यासाठी नक्षली कमांडर्सनी जुन्या ह्युमन इंटेलिजन्सचा अवलंब करावा’, अशी सूचना नक्षलवाद्यांना दिली आहे.

३. नक्षलग्रस्त भागांत पोलिसांची वाढती संख्या आणि नक्षलींची अल्प संख्या लक्षात घेता माओने अनेक दशकांपूर्वी दिलेला ‘गोरिल्ला युद्धतंत्रा’चा अवलंब करा, असा आदेशही केंद्रीय समितीने नक्षली कमांडर्सना दिला आहे.

४. पोलिसांचे वाढते वर्चस्व लक्षात घेता ‘एका ठिकाणी अधिक दिवस थांबू नका, विखरून रहा, सतत चालत रहा’, अशा सूचनाही कमांडर्सना दिल्या आहेत.

संपादकीय भूमिका

अशी बतावणी करून नक्षलवाद्यांकडून पुन्हा पोलीस आणि सैनिक यांच्यावर गनिमी काव्याने आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत देशातील नक्षलवाद आणि माओवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ‘नक्षलवाद्यांपासून देशाला धोका आहे’, हे शासकर्ते आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्षात ठेवले पाहिजे.