(म्हणे) ‘कॅनडात होणार्‍या खलिस्तानी आंदोलनावरून आम्ही सतर्क !’ – कॅनडा

सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणावरून वक्तव्य

भारताच्या विरोधात स्वत:च्या भूमीचा वापर करू देणार का कॅनडा ?

नवी देहली – अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथील भारतीय दूतावासावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणावरून कॅनडाने वक्तव्य जारी केले आहे. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, कॅनडामध्ये ८ जुलै या दिवशी होणार्‍या भारताच्या विरोधातील आंदोलनाच्या प्रसारसाहित्यावरून आम्ही भारतीय अधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत. सॅन फ्रॅन्सिस्को येथील घटना निषेधार्ह आहे.

काही दिवसांपूर्वी कॅनडातील खालिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या झालेल्या हत्येला खलिस्तान्यांनी अमेरिकेतील दोघा भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांना उत्तरदायी ठरवले आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू, तसेच महावाणिज्यदूत डॉ. टी.व्ही. नागेंद्र प्रसाद हे ते अधिकारी असून त्यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवरून पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत.

कॅनडातील मिसिसुआगा शहरात आयोजित आंदोलनाच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या मोर्च्याला ‘खलिस्तान फ्रीडम रॅली’ असे नाव देण्यात आले असून या मोर्च्याला ‘ग्रेट पंजाब बिझनेस सेंटर’ येथून आरंभ होऊन तो भारतीय दूतावासाच्या समोर थांबणार आहे. खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याला ‘हुतात्मा’ म्हटले जात असून दोघा भारतीय अधिकार्‍यांना ‘हत्यारे’ म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या विरोधात स्वत:च्या भूमीचा वापर करू देणार्‍या कॅनडाच्या अशा वक्तव्यांवर विश्‍वास ठेवण्याऐवजी भारताने त्याला हे आंदोलन रहित करण्यास भाग पाडले पाहिजे !