प्रमोद मुतालिक यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाच्या विरोधातील गुन्हा रहित !

  • कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्ष २०१७ मधील प्रकरणाविषयी दिला निर्णय

  • पोलीस अधिकारी सोडल्यास अन्य कुणी स्वतंत्र साक्षीदार नसल्यामुळे आणि ध्वनीचित्रीकरणात आक्षेपार्ह न आढळल्यामुळे गुन्हा रहित !

प्रमोद मुतालिक

बेंगळुरू (कर्नाटक) – श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी वर्ष २०१७ मध्ये कथित रूपाने केलेल्या प्रक्षोभक भाषणाच्या संदर्भात नोंदवलेला गुन्हा कर्नाटक उच्च न्यायालयाने रहित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात श्री. मुतालिक यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले होते. तेव्हा त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत तेथे उपस्थित पोलीस अधिकार्‍याने मुतालिक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.

१. पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यानुसार श्री. मुतालिक यांनी हिंदु आणि मुसलमान यांच्यातील गायीशी असलेल्या वर्तनातील भेदाविषयी टिप्पणी करून गायीची हत्या करणार्‍यांचे हात तोडण्याची भाषा केली होती.

२. यावरून पोलिसांनी भा.दं.वि. १५३ अ (दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे) आणि २९५ अ (धार्मिक भावना आणि धर्म यांचा अनादर करणे) या कलमांखाली गुन्हा नोंद केला होता.

३. श्री. मुतालिक यांनी गुन्हा रहित करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी म्हटले की, त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा हा फौजदारी प्रक्रिया संहिता १९६ (राज्याच्या विरोधात गुन्हा केल्यामुळे खटला चालवणे) यांतर्गत येत नाही. तसेच भाषणाच्या वेळी केवळ पोलीस अधिकार्‍याचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले नाहीत.

४. यासंदर्भात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राचा अभ्यास करून उच्च न्यायालयाने म्हटले की, संबंधित कार्यक्रमाचे ध्वनीचित्रीकरण पाहिल्यावरही श्री. मुतालिक यांनी केलेल्या भाषणात आक्षेपार्ह असे काही आढळले नाही. यासमवेतच राज्यशासनाच्या अनुमतीविना भा.दं.वि. १५३ अ आणि २९५ अ यांतर्गत गुन्हा नोंद करता येऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने मुतालिक यांच्या विरोधातील गुन्हा रहित करण्याचा आदेश दिला.

संपादकीय भूमिका 

  • न्यायालयाने गुन्हा रहित केला, याचा अर्थ नोंदवलेला गुन्हा चुकीचा होता. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा रहित करण्यासह तो नोेंदवणार्‍या पोलिसांवर न्यायालयाने कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
  • पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून त्यांनी आकसापोटी श्री. मुतालिक यांच्यावर कारवाई केली होती, हे लक्षात येते. असे पोलीस निष्पाप हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण काय करणार ?