पचायला जड आणि हलके पदार्थ कसे ओळखावेत ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०९

पचायला जड आणि हलके पदार्थ 

‘जे पदार्थ खाल्‍ल्‍यावर सुस्‍ती येते किंवा शरिरात जडपणा जाणवतो, ते पदार्थ पचायला जड असतात. सर्व प्रकारची पक्‍वान्‍ने, गोडधोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ (तूप आणि ताक सोडून), कच्‍चे (न शिजवलेले) पदार्थ (उदा. कच्च्या भाज्‍या, भिजवलेली किंवा मोड आणलेली कडधान्‍ये), ही जड पदार्थांची काही उदाहरणे आहेत.

या उलट जडपणा निर्माण न करणारे पदार्थ पचायला हलके असतात. रव्‍याचा उपमा, वरणभात, मुगाच्‍या डाळीचे कढण (डाळ शिजवून तिच्‍यामध्‍ये मीठ आणि गूळ घालून बनवलेला पदार्थ), भाताच्‍या लाह्या, भाजलेले पोहे, ही पचायला हलक्‍या पदार्थांची काही उदाहरणे आहेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)