महिलांनी गिधाडी (जिल्‍हा गोंदिया) गावात घेतला मद्यबंदीचा निर्णय !

अवैध मद्यविक्री करणार्‍याला १ लाख रुपयांच्‍या दंडाचा ठराव संमत !

प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर – गोंदिया जिल्‍ह्यातील गोरेगाव तालुक्‍यातील गिधाडी येथे अवैधरित्‍या देशी आणि विदेशी मद्यविक्री बंदीचा निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतला आहे. यापुढे कुणीही मद्य विक्री करतांना आढळल्‍यास त्‍याच्‍यावर १ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे गावातून अवैध मद्यविक्री हद्दपार होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली जात आहे.

‘अवैध मद्यविक्री करणार्‍याची माहिती देणार्‍यास ५० सहस्र रुपयांचे पारितोषिक आणि उर्वरित ५० सहस्र रुपये गावाच्‍या विकासासाठी व्‍यय करण्‍यात यावेत’, असा ठराव संमत करण्‍यात आला आहे. ग्रामसभेच्‍या वेळी गावात पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

१. गिधाडी येथे जवळपास १५ ते १८ जणांकडून अवैधरित्‍या मद्यविक्री केली जाते. त्‍यामुळे गावातील किशोरवयीन तरुण व्‍यसनाधीन बनले आहेत. गावात अवैध देशी आणि विदेशी मद्य विक्रीवर आळा घालण्‍याचा गावकर्‍यांनी प्रयत्न केला; पण अवैध मद्यविक्री बंद करता आली नाही.

२. मद्याचा वाढता खप पहाता परवानाधारक देशी मद्य किरकोळ विक्रेत्‍याने कायमस्‍वरूपी दुकान थाटण्‍यासाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज केला. यामुळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी देशी मद्य दुकान परवाना धारकास ना हरकत प्रमाणपत्र देण्‍यात यावे किंवा ना हरकत प्रमाणपत्रास नकार देण्‍यात यावा, यासाठी १८ जून या दिवशी महिला ग्रामसभा आणि १९ जून या दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्‍यात आले होते.

३. ही ग्रामसभा भरण्‍यापूर्वी महिलांनी गावात महिला जागृती मोर्चा काढला. गावातील अवैध मद्यविक्री करणार्‍यांना ताकीद दिली आणि ग्रामपंचायत भवनात आयोजित ग्रामसभेत परवानाधारक देशी किरकोळ दुकान लावण्‍यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, यांसह वरील निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतले.

संपादकीय भूमिका

अशी कृती राज्‍यातील सर्व ग्रामीण भागांत होणे आवश्‍यक आहे, तरच मद्यबंदीला आळा बसेल !