प्रसारमाध्यमांनी न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करतांना सावधगिरी बाळगावी – केरळ उच्च न्यायालय

तिरुवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच प्रसारमाध्यमांना न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. न्यायालयात खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्तींनी केलेल्या तोंडी टिप्पणीवर आधारित वृत्त देतांना प्रसारमाध्यमांनी वादींची होणारी हानी लक्षात घेतली पाहिजे, असे न्यायमूर्ती ए.के. जयशंकरन् नांबियार आणि न्यायमूर्ती महंमद नियास यांच्या खंडपिठाने म्हटले आहे. प्रिया वर्गीस यांनी न्यायाधिशांच्या आदेशाच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी खंडपिठाने वरील आवाहन केले. न्यायाधिशांनी कन्नूर विद्यापिठाला प्रिया वर्गीस यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यासाठी तिची ओळखपत्रे पुन्हा तपासण्याचे निर्देश दिले होते. हे वृत्त प्रसारमाध्यमांनी माठ्या प्रमाणात लावून धरले होतेे; कारण प्रिया वर्गीस यांचे लग्न मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांचे खासगी सचिव के.के.रागेश यांच्याशी झाले होते.

भारताचे सरन्यायाधीश डी.व्हाय. चंद्रचूड यांनीही प्रसारमाध्यमांना न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांविषयीचे वृत्त प्रसारित करतांना संयम बाळगण्याचे आवाहन केल्याचेही खंडपिठाने स्पष्ट केले.