रामनाथी, २१ जून (वार्ता.) – गोवा राज्यातील कळंगुट येथे शिवप्रेमींनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी कळंगुट ग्रामपंचायतीने २ दिवसांपूर्वी आदेश काढला होता. या विरोधात शिवस्वराज्य संघटना आणि स्थानिक शिवप्रेमी यांनी तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी एकत्रित येऊन शेकडो शिवप्रेमींनी याचा निषेध करत आदेश मागे घेण्याची मागणी केली. शिवप्रेमींच्या या आंदोलनामुळे शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश ग्रामपंचायतीने मागे घेतला, तसेच याविषयी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी क्षमायाचना केली.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मठकर आणि उपाध्यक्ष श्री. प्रज्योत कळंगुटकर यांचा सत्कार सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आला. शिवस्वराज्य संघटनेचे सर्वश्री सुरेश मयेकर, सिद्धेश गोवेकर आणि प्रसाद शिरोडकर या वेळी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करून आनंद व्यक्त केला.