श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील शाळेत हिजाब परिधान न करण्याच्या निर्णयाला विद्यार्थिंनींकडून आंदोलन करत विरोध !

शिक्षण सचिवांकडून शाळेच्या प्राचार्यांना याविषयी लेखी उत्तर देण्याचा आदेश  

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील विश्‍वभारती उच्च माध्यमिक विद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींना अबाया (बुरख्यासारखा वेश) आणि हिजाब परिधान करून न येण्यास सांगण्यात आल्याने या विद्यार्थिनींकडून शाळेबाहेर आंदोलन चालू करण्यात आले आहे. या प्रकरणी शिक्षण सचिवांनी शाळेच्या प्राचार्यांकडे याविषयी विचारणा करत उत्तर देण्यास सांगितले आहे.

१. शाळेच्या प्राचार्या मीम रोज यांनी मुलींनी केलेले आरोप निराधार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, मी अबाया किंवा हिजाब यांच्या विरोधात नाही. विद्यार्थिनींनी रंगीत हिजाब आणि अबाया परिधान करून शाळेत यावे, हे योग्य वाटत नाही; म्हणून आम्हाला एक योग्य गणवेश हवा आहे.

२. विश्‍वभारती उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना वर्ष १९५१ मध्ये झाली असून काश्मीर खोर्‍यातील ही सर्वांत जुनी शाळा आहे. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी या शाळेला आग लावली होती. आता ती ट्रस्टद्वारे चालवली जाते. मुख्य विश्‍वस्त काश्मिरी हिंदु आहेत; मात्र शाळेत शिकणारे बहुतांश मुले आणि मुली, तसेच प्राचार्या मुसलमान आहेत.