आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे        

।। श्रीकृष्णाय नम: ।।

पू. अनंत आठवले

सिद्ध संत-महात्मे, गुरु, ईश्वराचे अवतार, स्वत: ईश्वर आपल्या दैवी सामर्थ्याने मनुष्याच्या मनातील विचार पालटण्याचे, बुद्धीचे निर्णय पालटण्याचे काम करीत नाहीत. उदाहरणार्थ  संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, आद्यशंकराचार्य इत्यादी श्रेष्ठ संत-विभूतींनी त्यांना त्रास देणार्‍यांच्या दुर्बुद्धीला पालटून तिची सुबुद्धी केली नाही. महर्षी व्यासांनी दुर्याेधनाचा लोभ नष्ट केला नाही. ही झाली महात्म्यांची उदाहरणे. ईश्वराची उदाहरणे पाहिली तर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढाईचा आरंभ होण्याआधी अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण होऊन ‘युद्ध करू नये’, असे त्याला वाटले. सोळा कलांचा पूर्णावतार असलेल्या भगवान् श्रीकृष्णांनी आपल्या दैवी सामर्थ्याने अर्जुनाची बुद्धी पालटून एका क्षणात त्याला युद्धाला अनुकूल केले नाही. त्यांनी ५७४ श्लोकांतून अर्जुनाला उपदेश केला, काय योग्य आहे आणि काय चुकीचे ते समजावले, खरे शाश्वत कल्याण कशात आहे आणि ते कसे होईल, हे सांगितले. एवढे सगळे सांगून झाल्यावर पुढे काय करायचे, ह्याचा निर्णय अर्जुनावरच सोपवला. प्रभु श्रीरामांनी रावणाची बुद्धी सुधारली नाही, भगवान् नृसिंहाने हिरण्यकशिपुची चित्तवृत्ती पालटली नाही. महात्मे काय आणि ईश्वर काय, ते मनुष्याच्या स्वभावातील दोष काढून टाकत नाहीत, त्याची चित्तशुद्धी करीत नाहीत. ते सर्वजण केवळ काय योग्य आहे ते सांगतात, मार्गदर्शन देतात.

आपली सुद्धा अशीच स्थिती आहे. कोणी गुरु किंवा ईश्वर येऊन आपल्याकडून घडलेल्या चुकांचे, पापांचे परिणाम नष्ट करणार नाही, आपला स्वभाव सुधारून देणार नाही. आपण भाग्यशाली आहोत की आपल्याला ग्रंथांमधून, गुरुंकडून मार्गदर्शन मिळाले आहे. आता पुढे आपली चित्तशुद्धी आपल्याला करायची आहे, आपल्यालाच करायची आहे !

भगवद्गीतेत भगवान् श्रीकृष्ण सांगतात –

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन:।।

अ.६ श्लोक ५

अर्थ – आपला उद्धार आपण स्वत:च करावा, आपली अवनती करू नये. आपणच आपले बंधू असतो, आपणच आपले शत्रू असतो.

जो आपले हित इच्छितो, तो आपला बंधू असतो. मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपण वागलो तर आपले हित होईल, म्हणजे आपणच आपले हित केले, आपणच आपले बंधू बनलो. जो आपल्या वाईटाची इच्छा करतो,  आपले अहित होण्याची इच्छा करतो, तो आपला शत्रू असतो. मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपण सन्मार्गाने चाललो नाही तर आपणच आपली अधोगती करून घेऊ, आपण आपले शत्रू बनू. तेव्हा, आपल्याला आपले हित करायचे आहे, उद्धार करायचा आहे; अधोगती तर नाहीच करायची. पण आधी सांगितल्याप्रमाणे मुख्य गोष्ट ही आहे की गुरु किंवा ईश्वर येऊन आपल्यासाठी हे करणार नाहीत. हे स्वत:साठी स्वत:लाच करायचे आहे, त्याला पर्याय नाही.

– अनंत आठवले. २२.०४.२०२३

।। श्रीकृष्णापर्णमस्तु ।।

पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.