हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची स्वच्छता करून मूर्तीचे पूजन

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी

सोलापूर – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केलेले औक्षण आणि स्वराज्याची गुढी उभारतांना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती, अशा शिवमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस नागेश सरगम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, कु. वर्षा जेवळे, श्री. मिनेश पुजारे यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्वच्छता करून भगवे ध्वज लावण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून स्वातंत्र्यवीर सावरकर रचित शिवरायांची आरती म्हणण्यात आली. या कार्यक्रमाची सांगता ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. विपुल भोपळे यांनी केले.