रत्नागिरी बसस्थानकात प्रवाशांची आरक्षणासाठी होत आहे गर्दी  

ताटकळत उभे राहूनही तिकिटाची निश्चिती नसल्याने प्रवाशांची होते गैरसोय !

रत्नागिरी – उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेले मुंबईकर आता पुन्हा मुंबईला परतत आहेत. रेल्वेगाड्यांना गर्दी असल्यामुळे आता एस्.टी.चे आरक्षण मिळवण्यासाठी येथील बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. सुरक्षित प्रवास म्हणून खासगी गाड्यांपेक्षा एस्.टी.ला पसंती देणार्‍या प्रवाशांना मात्र आता आरक्षणासाठी २-३ तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. एवढे उभे राहूनही तिकीट मिळण्याची निश्चिती नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, असे वृत्त रत्नागिरी२४ वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.


आरक्षणाची वेळ होताच तिकीट खिडक्यांवर प्रवासी रांगा लावतात; मात्र खिडकी उघडताच आरक्षण ‘हाऊसफुल्ल’ होत असल्याने रांगेत उभ्या रहाणार्‍या अनेकांना तिकिटाविना माघारी परतावे लागते. मे मासात होणारी प्रवाशांची ही गर्दी पहाता ‘एस्.टी. महामंडळाच्या अधिकार्‍यांनी यापूर्वी नियोजन करून विशेष लक्ष दिले असते, तर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता आली असती’, असे प्रवाशांकडून म्हटले जात आहे.
या समस्येविषयी येथील आगारव्यवस्थापक पाटील म्हणाले की, बि.एस्.एन्.एल.चा सर्व्हर असल्याने १ तिकीट काढण्यास अनुमाने ७ ते ८ मिनिटे लागत आहेत. यामुळे गर्दीत वाढ होत असते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत कर्मचार्‍यांची जेवणाची वेळ न्यून करण्यात आली आहे. यातून गर्दी अल्प होण्यास साहाय्य होईल. हा सर्व्हर एकाच ठिकाणी मर्यादित असल्याने अन्य खिडकीतून आरक्षण चालू करू शकत नाही. काही दिवसांनंतर इथे चालू असणारी यंत्रणा रहाटघर आगारातून चालू करण्यात येणार आहे. सद्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत.

संपादकीय भूमिका

खासगी गाड्यांकडे वळण्याअगोदरच प्रवाशांना एस्.टी. सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे !