राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश !

राज्यशासनाचा निर्णय

पुणे – प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिला जाणारा विनामूल्य गणवेश आणि त्याचा रंग हा शाळा व्यवस्थापन समिती, संबंधित संस्था यांच्या स्तरावर ठरवला जात असे; परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून सरकारच्या वतीने गणवेशाचे कापड दिले जाणार आहे. त्याची शिलाई ही बचत गट किंवा स्थानिक पातळीवर केली जाणार आहे. असा प्रस्तावच शासनाला दिला असून या वर्षीपासून त्याची कार्यवाही करण्यात येणार, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अन् सर्व विद्यार्थिनींना विनामूल्य गणवेश देण्यात येतो; मात्र या वर्षीपासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्यात येणार आहे.

प्रतिवर्षी मेमध्ये जिल्हास्तरावर निधी मिळतो आणि पुढील कार्यवाही केली जाते; परंतु चालू वर्षी हा निधी मिळाला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया करून मुलांना वेळेत गणवेश मिळणे अवघड असल्याचे दिसून येत आहे.