ढवळी येथील भंगारअड्ड्याला भीषण आग : लाखो रुपयांचे भंगार भस्मसात

भंगारअड्ड्याला भीषण आग

फोंडा, ५ मे (वार्ता.) – फोंडा-मडगाव महामार्गावर ढवळी येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या भंगारअड्ड्याला ५ मे या दिवशी दुपारी १.३० वाजता भीषण आग लागली. ही आग जवळच्या अन्य एका भंगारअड्ड्यालाही लागली. काळ्या धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले आणि त्यामुळे रस्त्यावर काही अंतरापर्यंत धुराव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. या भंगारअड्ड्यापासून १०० मीटर अंतरावर पेट्रोलपंप आहे; परंतु तेथपर्यंत आग न पसरल्याने अनर्थ टळला. आगीनंतर लगेच हा पेट्रोलपंप बंद करण्यात आला. आगीने भीषण रूप धारण केल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर फोंडा-मडगाव रस्त्यावरील वाहतूक ढवळी येथे बंद करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आली; मात्र आग पूर्णपणे विझण्यासाठी आणखी काही घंटे लागणार असल्याची माहिती अग्नीशमन केंद्राने दिली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी पूर्व गोव्यातील अग्नीशमन दलाच्या पाण्याच्या बंबांना पाचारण करण्यात आले. आगीची झळ इतर भंगारअड्ड्यांना लागू नये यासाठी आगीपासून भंगार दूर करण्यात आले. भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीत भंगारअड्ड्यासमोर ठेवलेली वाहने बेचिराख झाली. यामध्ये एक ट्रक आणि एका रिक्शा यांचा समावेश आहे. कवळे पंचायत क्षेत्रात सुमारे २० भंगारअड्डे आहेत.

८ दिवसांत सर्व भंगारअड्डे हटवणार ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर

सुदिन ढवळीकर

ढवळी येथील भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीविषयी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पहाणी केली. याप्रसंगी वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘८ दिवसांत सर्व भंगारअड्डे हटवणार. डिचोलीतील उपजिल्हाधिकारी ४२ घंट्यांमध्ये ३ भंगारअड्डे हटवू शकतो, तर फोंडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी असे का करू शकत नाहीत ? उपजिल्हाधिकार्‍यांनी आज झालेली दुर्घटना प्रत्यक्ष पाहिली आहे. १२ मेपर्यंत हे सर्व भंगारअड्डे हटवावेत.’’

भंगारअड्डे १२ मेपर्यंत न हटवल्यास धरणे आंदोलन करणार ! – कवळे पंचायत

भंगारअड्डे १२ मेपर्यंत न हटवल्यास धरणे आंदोलन करणार असल्याची चेतावणी कवळे पंचायतीने दिली आहे. आग लागलेल्या भंगारअड्ड्यासाठी ‘ना हरकत दाखला’ घेतलेला नव्हता, तसेच जवळच्या अन्यही भंगारअड्ड्यांकडे ‘ना हरकत दाखला’ नव्हता आणि हे भंगारअड्डे हटवण्यास कवळे पंचायतीने सांगितले होते.