लठ्ठपणा न्‍यून करण्‍यासाठीच्‍या प्रयत्नांसह संयमही हवा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९०

‘दिवसातून १ किंवा २ वेळाच जेवणे आणि नियमित व्‍यायाम करणे’, या दोनच कृती नियमितपणे केल्‍याने लठ्ठपणा न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते; परंतु हे उपाय न चुकता प्रतिदिन काही मास करावे लागतात. आवश्‍यकतेनुसार वैद्यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार घ्‍यावे लागतात. या उपायांना स्‍वतःच्‍या जीवनशैलीचा भाग बनवावे लागते. काहींना लठ्ठपणा न्‍यून होण्‍यासाठी प्रयत्न चालू केल्‍यावर लगेच गुण हवा असतो. तो गुण मिळाला नाही, तर ते निराश होऊन प्रयत्न करायचेच सोडून देतात.

वैद्य मेघराज पराडकर

वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्‍यावर न्‍यूनतम ५ – ६ वर्षे शिक्षण घ्‍यावे लागते. प्रवेश घेतल्‍या घेतल्‍या कुणी वैद्य किंवा डॉक्‍टर बनत नाहीत. विद्यार्थ्‍याने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्‍यावर लगेच शिक्षण सोडून दिले, तर तो कधीही वैद्य बनू शकणार नाही.

लठ्ठपणा न्‍यून करण्‍यासाठीच्‍या प्रयत्नांच्‍या संदर्भातही असेच असते. वर दिलेले प्रयत्न गुण येईपर्यंत नेमाने करणे आवश्‍यक असते. तसे होण्‍यासाठी संयम असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका :  bit.ly/ayusanatan