गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

पणजी, १ मे (वार्ता.) – बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली आहे.

पणजी येथे राज्यस्तरीय कामगारदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी निधी विनावापर रहाण्याला कामगार मंडळाला उत्तरदायी ठरवले आहे. या मंडळात सरकारी अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांचा सहभाग असतो.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘निधी वापरण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय कामगार मंडळ घेते. यात सरकारचा जराही सहभाग नसतो. ‘अधिकाधिक निधीचा वापर व्हावा, यासाठी मंडळाची बैठक प्रत्येक मासाला घ्यावी’, असे मी कामगार आयुक्तांना निर्देश दिले आहेत. हा निधी कामगारांसाठी घर बांधणे, सांडपाणी निस्सारण सुविधा आणि त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा यांसाठी वापरता येतो. हा निधी चांगल्या प्रकारे वापरला जावा, यासाठी सरकारला साहाय्य करण्यासाठी या मंडळावर २ अशासकीय संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.’’