जिवावर बेतलेले ‘अनधिकृत’ होर्डिंग !

किवळे ओव्‍हरब्रीज सर्व्‍हिस रस्‍त्‍यावर वादळी वार्‍यामुळे कोसळलेले होर्डिंग

कात्रज-देहूरोड (पुणे) बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्‍हरब्रीज सर्व्‍हिस रस्‍त्‍यावर वादळी वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्‍यू झाला. अचानक सोसायट्याचा वारा आल्‍याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणारे कामगार एका पंक्चरच्‍या दुकानामध्‍ये आडोशाला थांबले होते. त्‍याच वेळी मोठे होर्डिंग कोसळून ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्‍हणजे पुण्‍यात होर्डिंग कोसळून मृत्‍यू होण्‍याची ही पहिली घटना नाही. याआधीही पुण्‍यात रस्‍त्‍यावर होर्डिंग कोसळल्‍याने अनेकांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे पुन्‍हा एकदा सर्वसामान्‍यांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व विज्ञापन फलकांचे ‘ऑडिट’ आणि प्रतिवर्षी ‘स्‍ट्रक्चर ऑडिट’ करण्‍याविषयी राज्‍य लेखा स्‍थानिक परीक्षण समितीने महापालिकेला एका पत्राद्वारे कळवले होते; पण महापालिकेने त्‍याकडे दुर्लक्ष केल्‍याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्त्‍यांनी केला आहे. धक्‍कादायक म्‍हणजे वरील घटना घडली असतांना आकाश चिन्‍ह आणि परवाना विभागाचे अधिकारी रजेवर असल्‍याने प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्‍येने अवैध होर्डिंग आहेत. त्‍याकडे न्‍यायालयाचे कारण पुढे करून महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शहरात जवळपास २ सहस्र २०० होर्डिंग हे अवैध आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी ऐकल्‍यानंतर प्रशासन काही करते कि नाही ? असा प्रश्‍न पडतो की, अवैध होर्डिंग लावण्‍यासाठी त्‍यांचीच परवानगी आहे का ? असेही वाटते.

अवैध होर्डिंगमुळे नाहक मृत्‍यू झालेल्‍या जिवांचे दायित्‍व कोण घेणार ? केवळ काही रक्‍कम हानीभरपाई म्‍हणून देण्‍याने दायित्‍व संपते का ? होर्डिंगमुळे लोकांचे जीव गेल्‍यानंतरच प्रशासन का जागे होते ? आणि जागे झाले म्‍हणून कायमचे जागे झाले असेही नसते, हे संतापजनक आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात अवैध होर्डिंग का आणि कसे उभारले गेले ? याच्‍या मुळाशी जाऊन संबंधितांनाही शिक्षा होणे आवश्‍यक आहे. आतातरी प्रशासन अवैध होर्डिंग लागले जाणार नाहीत, यादृष्‍टीने काही ठोस प्रयत्न करणार का ? कि पुन्‍हा कुणाचा तरी नाहक मृत्‍यू झाल्‍यानंतर जागे होणार ? हे प्रश्‍न मात्र अनुत्तरित रहातात. एकूणच प्रशासकीय अधिकार्‍यांची जनतेप्रतीची संवेदनशीलता वाढून अयोग्‍य गोष्‍टी थांबवण्‍यासाठीचे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे