मुंबई – आंदोलन करणारे सर्व भूमीपुत्र आहेत. त्यांच्या संमतीविना किंवा कुणावर अन्याय करून कोणताही प्रकल्प पुढे न्यायचा नाही, अशी शासनाची भूमिका आहे. बारसू येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ७० टक्क्यांहून अधिक लोकांचे समर्थन आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देतांना केले.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आंदोलन करणारे काही लोक स्थानिक, तर काही बाहेरचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या कामासाठी बळजोरी केली जाणार नाही. विरोधकांना प्रकल्पाचे महत्त्व समजावून देऊ. प्रकल्पामुळे नागरिकांना रोजगार मिळेल. तेथील परिस्थिती चिघळली असल्याचे विरोधकांचे म्हणणे खोटे आहे. सध्या बारसू येथे शांतता आहे. उद्योगमंत्रीही स्वतः शेतकर्यांशी बोलत आहेत.’’