बारसू (राजापूर) येथील आंदोलन तुर्तास स्थगित : सरकार आंदोलकांशी चर्चा करणार !

बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला असलेल्या विरोधाचे प्रकरण

प्रस्तावित बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्प

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथील आंदोलन ३ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या कालावधीत आंदोलन आणि सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. सरकारच्या वेगवेगळ्या आश्‍वासनांनंतरही प्रकल्पाचे माती सर्वेक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत. ‘पुढील ३ दिवसांमध्ये प्रकल्पाचे माती सर्वेक्षण थांबले नाही, तर पुन्हा आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलक काशिनाथ गोरले यांनी दिली. या ३ दिवसांत चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय स्थानिक आंदोलकांनी घेतला आहे. यापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘सरकार आंदोलकांशी चर्चा करेल’, असे आश्‍वासन आंदोलकांना दिले होते.

आंदोलनाविषयी २८ एप्रिल या दिवशीचा घटनाक्रम !

पोलिसांकडून आंदोलकांवर आज पुन्हा सौम्य लाठीमार !

तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पावरून तणावपूर्ण बनलेले वातावरण शांत होत असतांनाच आज २८ एप्रिलला वातावरण पुन्हा चिघळले होते. ‘आम्ही प्रकल्पाचे सर्वेक्षण बंद पडणारच’ अशी भूमिका प्रकल्पाच्या विरोधात असणार्‍या आंदोलकांनी घेतली.

त्यानुसार दुपारी १२ वाजता शेकडो आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले अडथळे तोडून प्रकल्पाच्या माती सर्वेक्षण चालू असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना पांगवण्यासाठी प्रथम अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नंतर सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना कह्यातही घेतले.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनाही पोलिसांनी घेतले कह्यात !

प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी जमलेल्या प्रकल्पविरोधकांची भेट घेण्यासाठी निघालेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

त्यांच्यासह संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

पोलिसांनी लाठीमार केला, तरी मागे हटणार नाही ! – आंदोलनकर्त्या महिला

पोलिसांनी लाठीमार केला, तरीही आम्ही मागे हटणार नाही. हे आंदोलन चालूच राहील. आमची डोकी फुटली, तरी आम्ही आंदोलन करणारच आहोत. ‘ही भूमी तुमच्या बापाची नाही, आमची आहे’, असे आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले आहे.