बारसू (राजापूर) येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण

२२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत प्रशासनकडून मनाई आदेश

प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ

रत्नागिरी – जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षणाचे काम २४ एप्रिलपासून केले जाणार आहे. या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्‍या प्रकल्पविरोधी संघटना आणि ग्रामस्थ यांच्याकडून सर्वेक्षणाच्या या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी राजापूर, बारसू आणि सोलगाव या सर्वेक्षणाचे काम होणार्‍या १ किलोमीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ म्हणजे जमावबंदी आदेश जारी केले आहेत. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या १ किलोमीटरच्या परिसरात ‘ड्रिलिंग’ करून माती सर्वेक्षण करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘क्रूड ऑईल’ रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ असून रिफायनरी विरोधी संघटना राजापूर, तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.
‘या प्रकल्पाच्या विरोधात विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन केली आहेत. तसेच इतर भागांतूनही आंदोलक अशा आंदोलनात सहभागी होत असतात’, अशी टिप्पणी या आदेशात करण्यात आली आहे.