जितेंद्र आव्हाड यांना मोकोका लावून तडीपार करा ! – तुषार भोसले, प्रमुख, अध्यात्मिक आघाडी, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हिंदु सणांवर टीका केल्याचे प्रकरण

जितेंद्र आव्हाड वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करत आहेत

नाशिक, २३ एप्रिल (वार्ता.) – जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस हा वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करत आहे, तसेच जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंचे सण आणि उत्सव यांना अपर्कीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) लावून त्यांना तडीपार करावे, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी २३ एप्रिल या दिवशी केली.

१. तुषार भोसले म्हणाले, ‘‘रमजानच्या वेळीच जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती दंगलीसाठीच असतात’, असे विधान केले. त्यांच्या मतानुसार येणारे वर्ष हे दंगलींचे वर्ष असेल. असे वक्तव्य करणे म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे. जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंचे सण आणि उत्सव यांची अपर्कीती करण्याचा हा प्रयत्न आहे.’’

२. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दंगलीसाठी रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणे हा रामभक्तांचा अवमान आहे. या काळात दंगली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का ?’’

३. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपने आव्हाड यांच्या विरोधात मुंबई येथील अंधेरी एम्.आय.डी.सी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

४. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे; मात्र आव्हाड हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम असून ‘मी विचारपूर्वकच वक्तव्य केले आहे’, असा दावा त्यांनी केला आहे.