गुरुमाऊली सतत समवेत असल्याविषयी साधिकेला स्वप्नातही आलेली प्रचीती !

१. स्वप्नात दिसलेले दृश्य

कु. तीर्था देवघरे

१ अ. घराबाहेर पुष्कळ पाणी साचलेले असणे, साधिका नावेतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घेऊन जातांना एक वल्हे पाण्यात पडणे, ते वल्हे पाण्यावर तरंगून पुन्हा साधिकेच्या हातात येणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला काळजी न करण्यास सांगणे : ‘एकदा मला स्वप्नात दिसले, ‘एका घरात परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. तेथे घराबाहेर पुष्कळ पाणी साचले आहे. मला त्यांना तेथून दुसर्‍या ठिकाणी नेण्याची सेवा होती. त्यांना तेथून नेण्यासाठी एक नाव होती. त्यात प्रथम मी बसले आणि नंतर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) बसले. ते नावेत बसल्यावर आम्ही तेथून निघालो. आम्ही नावेतून जात असतांना मध्येच माझ्या एका हातातील वल्हे पाण्यात पडते. तेव्हा माझ्या मनात ‘अरे, असे का होत आहे ?’, असा विचार आल्यावर लगेच ते वल्हे आपोआप पाण्यावर तरंगू लागले आणि माझ्या हातात आले. तेव्हा गुरुमाऊली मला म्हणाले, ‘काळजी करू नकोस. मी तुझ्या समवेत आहे ना.’’ त्यांनी स्मितहास्य केले.

२. सहसाधिकेने स्वप्नाचा सांगितलेला भावार्थ

२ अ. साधिका मोहमायेच्या पाण्यातून साधनारूपी नावेतून जात असणे, साधिकेच्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांच्या प्रयत्नांत चढ-उतार होणे आणि गुरुदेवांनी साधिकेला ‘तुझ्या समवेत आहे’, असे सांगणे : मी या स्वप्नाविषयी सहसाधिकेला सांगितले. तेव्हा तिने मला स्वप्नाचा भावार्थ सांगितला, ‘‘घराबाहेर साठलेले पाणी, म्हणजे मोहमाया. तू ज्या नावेत बसली होतीस, ती म्हणजे तुझी साधना आहे. नाव चालवतांना तू जे वल्हे पकडले होतेस, ते म्हणजे तुझे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे प्रयत्न. तू मोहमायेचा त्याग करून साधना करतेस. तुझ्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांच्या प्रयत्नात चढ-उतार होत आहेत, तरीही गुरुदेव तुला म्हणाले, ‘काळजी करू नकोस. मी तुझ्या समवेत आहे.’’

३. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘कितीही कठीण परिस्थिती, वेळ किंवा प्रसंग असू दे, माझी गुरुमाऊली माझ्या समवेत सदैव रहाणार आहे.’

कृतज्ञता !’

– कु. तीर्था देवघरे (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक