युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता ! – गणेश नाईक, आमदार

गणेश नाईक

नवी मुंबई, ४ एप्रिल (वार्ता.) – आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्ती आणि मातृभक्ती यांविषयीच्या प्रेरणादायी विचारांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनता आणि युवा पिढी यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी नवी मुंबईमध्ये २ एप्रिल या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. वाशी येथील हॉटेल ब्लू डायमंड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत ही यात्रा काढण्यात आली होती. या गौरव यात्रेमध्ये सहस्रो सावरकरप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला होता.

( सौजन्य:Navi Mumbai Network)

यात्रेच्या सांगता सभेमध्ये गणेश नाईक म्हणाले की, देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वस्व पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतांनाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करत आहेत. हे आरोप करणार्‍यांचे दुर्भाग्य आहे. सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही.