एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
प्रतिनिधी : श्री. राहुल कोल्हापुरे
सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – सातारा बसस्थानकाच्या परिसरात कचराकुंडीऐवजी फलाटांपुढे उघड्यावरच कचरा टाकण्यात येत आहे. येथे इतका कचरा साचला आहे की, अक्षरश: बसस्थानकाला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. एस्.टी. महामंडळाची बसस्थानक स्वच्छता मोहीम चालू असली, तरी सातारा बसस्थानकाला मात्र त्याचे देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात न आल्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात कचर्याचे ढिग साचले आहेत. प्रवासी ‘स्नॅक्स’ (खाद्यपदार्थ) खाऊन त्याची वेष्टने बसस्थानक परिसरातच टाकतात. मुंबई आणि ठाणे येथे जाणार्या बसथांब्याच्या पाठीमागे प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. यामुळे बसस्थानकाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा प्रवाशांना त्रास होत आहे.
१. या परिसरात काही पडक्या खोल्या असून त्यामध्येही मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. मध्यवर्ती बसस्थानकातील मुतारीची कूपनलिका (ड्रेनेज) बसस्थानकाच्या परिसराच्या बाहेर सोडण्यात आली आहे; मात्र यासाठी आवश्यक ती उपाययोजना न केल्यामुळे बसस्थानक परिसराच्या बाहेरही मुतारीचा दुर्गंध पसरतो.
२. बसस्थानक प्रशासनाच्या वतीने प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र पाण्याच्या टाकीचे नळ गळत आहेत. यामुळे दिवसभरात अनेक लिटर पाणी वाया जाते. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी प्रवासी गुटखा आणि तंबाखू खाऊन चूळ भरतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण साठली आहे.
३. मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात श्री दत्त मंदिर असून त्याच्या पुढे बसगाड्या आडव्या लावल्या जातात. मंदिरापुढे स्वच्छता राखली जात नाही. यामुळे आगारात येणारे प्रवासी मंदिरात न जाता लांबूनच दत्तगुरूंचे दर्शन घेतात.
४. सातारा आगारात बाहेरून येणारे चालक आणि वाहक यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे; मात्र मुक्कामाच्या खोलीच्या छताला जळमटे झाली आहेत. पंखे अस्वच्छ स्थितीत आहेत. चालक-वाहक यांना भूमीवरच अंथरूण टाकून विश्रांती घ्यावी लागते.
५. चालक-वाहक यांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृहामध्ये कमालीची अस्वच्छता आहे. शौचालयातील, तसेच तेथील बेसिनमधील नळ गळत आहेत. त्यामुळे प्रसाधनगृहातील लादीवर पाणी पसरून ते ओले होते आणि त्यात प्रवाशांच्या पायांना लागून येणार्या मातीमुळे लाद्या अस्वच्छ होतात.
फलाटावरील ‘औरंगाबाद’ लिहिलेली पाटी अद्याप पालटलेलीच नाही !
‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’, असे नामकरण होऊन अनेक दिवस झाले, तरी सातारा बसस्थानकाच्या फलाटावर अद्यापही ‘छत्रपती संभाजीनगर’ ऐवजी ‘औरंगाबाद’ अशा नावाचीच पाटी आहे. या नामांतरापूर्वी हे फलक छापण्यात आले असले, तरी किमान त्यावर नवीन नावाची पट्टी चिकटवणे अपेक्षित आहे.
अधिक माहितीसाठी पहा
‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ !
बसस्थानकातील अस्वच्छतेची दुर्दशा दर्शवणारी अन्य छायाचित्रे पहाण्यासाठी
‘सनातन प्रभात’ संकेतस्थळाची मार्गिका : bit.ly/3KdwMec
(यातील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत, याची नोंद घ्यावी.)
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |