सातारा जिल्ह्यातील ४० गावांमधील ग्रामस्थांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी
सातारा जिल्ह्यातील ४० गावांचा संपर्क तुटण्याची भीती
रत्नागिरी – रत्नागिरी आणि सातारा या २ जिल्ह्यांना जोडणार्या रघुवीर घाटातील रस्ता आजही धोकादायक स्थितीत आहे. यामुळे आगामी काळात नैसर्गिक संकट आल्यास सातारा जिल्ह्यातील ४० गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या समस्येकडे लक्ष घालावे, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील ४० गावांमधील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
१. सातारा जिल्ह्यातील ४० हून अधिक गावांचा संपर्क रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी असतो. या गावांना सर्व भौतिक सुविधांसाठी रत्नागिरी जिल्ह्यावरच अवलंबून रहावे लागते. या दोन जिल्ह्यांना जोडणार्या रघुवीर घाटात एका बाजूला खोल दरी असून दुसर्या बाजूला घाटात खचलेला आणि अरुंद रस्ता यांमुळे येथील शिंदी विभागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
२. रघुवीर घाट हा पावसाळी पर्यटन आणि सातारा जिल्ह्यातील संरक्षित व्याघ्र प्रकल्प, तसेच कोयना अभयारण्यात जाण्यासाठीही प्रमुख मार्ग आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात याच रघुवीर घाटात भल्यामोठ्या दरडी कोसळत असल्याने हा रस्ता प्रशासनाकडून बंद ठेवला जातो. पावसाळ्यात तात्पुरती दरड हटवली जाते; मात्र त्याकडे पुन्हा प्रशासकीय यंत्रणा पहात नाहीत. त्यामुळेच घाटात कोसळलेल्या दरडी आजही रस्त्याच्या बाजूला पहायला मिळतात. या विभागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी खेड तालुक्यातील खोपी गावात एस्.टी.ने येतात; पण पावसाळ्यात हा रस्ता ठप्प झाला, तर विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित रहावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
३. या ४० गावांतील लोकांना महसुली कामकाजासाठी महाबळेश्वर येथे जावे लागते; मात्र पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रथम खेडला जाऊन पुढे जावे लागते. आता अवघ्या २ महिन्यांवर पावसाळा आला असतांनाही या घाटात अद्याप कोणतेही काम चालू झालेले नाही. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात रघुवीर घाटातील हा रस्ता पूर्णतः ठप्प होण्याची भीती येथील ग्रामस्थांना सतावत आहे.