एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
प्रतिनिधी : श्री. सुरेंद्र भस्मे, कराड
कराड, २८ मार्च (वार्ता.) – कराड बसस्थानकाच्या भिंती तंबाखू, पान आणि गुटखा यांच्या पिचकार्यांनी रंगल्या आहेत. अनेक मास अशा अवस्थेत असलेल्या या भिंती ना स्वच्छ केल्या आहेत, ना त्यावर उपाययोजना काढण्यात आली आहे. त्यामुळे ‘एस्.टी. महामंडळाची स्वच्छता मोहीम म्हणजे नेमकी काय चालू आहे ?’, असा प्रश्न पडतो. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य परिवहन मंडळाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कराड बसस्थानकाची ही स्थिती आहे.
१. बसस्थानकाच्या एका भिंतीवर एक-दोन पिचकार्या नव्हे, तर भिंतीचा काही भाग आणि आजूबाजूचा परिसर तंबाखू वा पानाच्या पिचकार्यांनी पूर्ण लाल रंगाचा झाला आहे. त्या ठिकाणी वेळीच सूचना लावून असे करणार्यांवर दंडात्मक कठोर कारवाई केली असती, तर भिंती विद्रूप झाल्या नसत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, तसेच या भिंतीही स्वच्छ न करता अनेक मास तशाच ठेवलेल्या आहेत.
२. बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याचे शीतयंत्र (कुलर) मागील ८ मासांहून अधिक काळ बंद असून त्याला गंज चढत आहे.
३. बसस्थानक मोठे असूनही प्रवाशांना बसण्यासाठी मोजकीच बाकडी आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना गाडीची वाट पहात ताटकळत उभे रहावे लागते.
४. मुंबई-बेंगळुरू या महामार्गावरील प्रमुख बाजारपेठ म्हणून कराडची ओळख आणि विशेष महत्त्व आहे. अशा या महत्त्वाच्या बसस्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छता, बसण्यासाठी बाकडे या अत्यावश्यक सुविधाही मिळत नाहीत, याविषयी प्रवाशांमध्ये अप्रसन्नता व्यक्त होत आहे.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |