राहुल गांधी यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याविषयी हिंदु महासंघ आक्रमक !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी

पुणे – प्रत्‍येक राजकीय पक्षाची आदर्श स्‍थाने आणि आदर्श व्‍यक्‍तीमत्त्वे वेगळी असू शकतात. हे हिंदु महासंघाला मान्‍य आहे; पण मागील काही मासांपासून हिंदुत्‍वाचे दैवत असलेल्‍या स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी राहुल गांधी अपकीर्तीचे धोरण सातत्‍याने अवलंबत आहेत. यापुढील काळातही राहुल गांधी यांनी त्‍यांना लक्ष्य करण्‍याचा प्रयत्न केला, तर मोहनदास गांधींची सर्व पापे अगदी ब्रह्मचार्‍याच्‍या प्रयोगापासून देशाच्‍या फाळणीपर्यंत, यांसह अनेक घटनांविषयी मोहनदास गांधी यांना उघड करण्‍याची इच्‍छा नाही; पण आम्‍हाला ते उघड करावे लागेल. राहुल गांधी यांच्‍या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये, याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे, अशी भूमिका हिंदु महासंघाचे अध्‍यक्ष श्री. आनंद दवे यांनी मांडली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी केलेल्‍या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्‍दांत निषेध व्‍यक्‍त केला. त्‍यानंतर पुणे येथील हिंदु महासंघही आक्रमक झाला आहे.

श्री. आनंद दवे पुढे म्‍हणाले की, आम्‍ही राहुल गांधी यांना एक आव्‍हान केले आहे. अंदमान कारागृहामध्‍ये स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे ११ वर्षे राहिले असून त्‍याच कारागृहामध्‍ये एक दिवस तरी राहुल गांधी यांनी राहून दाखवावे. त्‍या पार्श्‍वभूमीवर आम्‍ही अंदमान येथील तिकीट राहुल गांधी यांना पाठवले आहे. त्‍यांचा जाण्‍याचा-येण्‍याचा खर्च हिंदु महासंघ करेल.

  सौजन्य : लोकसत्ता