सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमामध्‍ये झालेले पालट !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी (गुरुमाऊलींनी) संस्‍था स्‍तरावर देवद, पनवेल येथे पहिला आश्रम स्‍थापन केला. त्‍यानंतर अन्‍य आश्रम स्‍थापन झाले. गुरुमाऊलींच्‍या मार्गदर्शनानुसार देवद आश्रमाचे बांधकाम झाले. गुरुमाऊलींच्‍या संकल्‍पशक्‍तीमुळे आणि त्‍यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेला हा देवद आश्रम आज त्‍यांच्‍याच कृपेने प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. त्‍याविषयी माझ्‍या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद आश्रम

१. महाप्रसादाचा लाभ चैतन्‍याच्‍या स्‍तरावर होणे

आश्रमात विविध ठिकाणी चैतन्‍य अधिक प्रमाणात जाणवते. येथील स्‍वयंपाकघरात बनणारे अन्‍नपदार्थ अधिक चविष्‍ट बनू लागले आहेत. सर्वांना महाप्रसादाचा लाभ चैतन्‍याच्‍या स्‍तरावर होऊ लागला आहे.

श्री. शंकर नरुटे

२. आश्रमाच्‍या परिसरातील फुलझाडे फुलांनी सतत बहरलेली आणि टवटवीत दिसणे

आश्रम परिसरात असणारी झाडे आणि वेली आश्रमाच्‍या दिशेने झुकली आहेत. आश्रमाच्‍या परिसरातील फुलझाडे फुलांनी सतत  बहरलेली आणि टवटवीत दिसतात. परिसरात असणार्‍या झाडांची साधक पुष्‍कळ मशागत करतात किंवा खत-पाणी घालतात, असे नाही, तरीही झाडांना फळे येतात. ही भगवंताची कृपाच आहे आणि साधक ही कृपा अनुभवतात.

३. मांजराने आश्रमातील धान्‍याचे रक्षण करणे आणि ‘ते शांत बसले असतांना ध्‍यानावस्‍थेत असते’, असे जाणवणे

आश्रमात एक मांजर आहे. ‘मांजराने अन्‍नपूर्णा कक्षात स्‍वतःहून जाऊन दूध प्‍यायले किंवा काहीतरी सांडले’, असे कधीच झाले नाही. आश्रमात राहून त्‍याच्‍यावरही चांगले संस्‍कार झाले आहेत. ते आश्रमातीलच एक सदस्‍य असल्‍यासारखेच वावरते. ते आश्रमातील धान्‍याचे उंदरांपासून रक्षण करते. हे मांजर निःस्‍वार्थीपणे सेवा आणि साधना करत आहे. साधक महाप्रसाद घेत असतांना ते साधकांच्‍या पायांजवळ येऊन बसते किंवा फिरत असते. त्‍याला साधकांच्‍या सहवासात रहायला अधिक आवडते. बर्‍याचदा मांजर शांतपणे बसून असते. त्‍या वेळी ‘ते ध्‍यानावस्‍थेत असते’, असे मला जाणवते.

‘आश्रमात जीव स्‍वतःची प्रगती करून घेण्‍यासाठी कोणत्‍या ना कोणत्‍या माध्‍यमातून येऊन प्रगती करून घेतो’, याचे हे एक उदाहरण आहे’, असे मला वाटते.

४. आश्रमासमोर प्राणी आणि पक्षी फिरत असतात. आश्रमाच्‍या समोर मुंगूस, भारद्वाज आणि पोपट अधिक करून सकाळच्‍या वेळी फिरत असतांना दिसतात.

५. आश्रमाच्‍या मागील बाजूला शिवमंदिर आहे. या ठिकाणी नाग, साप आणि अन्‍य सापांच्‍या जाती असलेले सरपटणारे प्राणी फिरत असतात; पण ते आश्रमाच्‍या परिसरात येत नाहीत.

६. आवश्‍यकतेनुसार धान्‍य अर्पण मिळत असणे आणि ‘भगवंताचे कार्य भगवंतच सांभाळतो’, असे लक्षात येणे

आश्रमात धान्‍यलक्ष्मी वास करू लागली आहे. आश्रमातील साधकांसाठी लागत असणारे धान्‍य मागणी करण्‍याआधीच अर्पण स्‍वरूपात मिळत असते. ज्‍या धान्‍याची आवश्‍यकता असते, तेच धान्‍य गुरुकृपेने अर्पण मिळते. यावरून ‘भगवंताचे कार्य भगवंतच सांभाळतो’, असे माझ्‍या लक्षात आले.

एकाच वेळी अनेक जिवांचा उद्धार करणारी प.पू. गुरुमाऊली ! गुरुमाऊलींच्‍या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. शंकर राजाराम नरूटे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक