स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे स्मारकास राज्यशासनाचा १ कोटी ५७ लाख रुपयांचा हिस्सा वितरित करावा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास राज्यशासनाचा १ कोटी ५७ लाख रुपयांचा हिस्सा वितरित करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २४ मार्च या दिवशी प्रधान सचिव आणि नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना दिले. त्यामुळे रखडलेल्या या कामाला आता गती मिळणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या संग्रामातील तात्या टोपे हे एक प्रमुख सेनानी होते. त्यांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य यांनी भारतीय स्वांतत्र्याच्या इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय लिहिला गेलेला आहे. त्यांचा हा इतिहास स्मरणात रहावा, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतू येवला येथे त्यांचे स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारकाचे काम निधीअभावी बंद पडले होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हा निधी देण्याची मागणी केली.

या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून उपलब्ध निधीपैकी ३ कोटी ९२ लाख रुपये या कामासाठी व्यय करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या या स्मारकात स्मृती उद्यान बांधण्यात येणार आहे. येथे माहिती केंद्र, शिल्पकृती, गॅलरी, प्रदर्शन सभागृह, वाचनालय, ऑडिओ-व्हिज्युअल हॉल, प्रतिकात्मक शिल्प गार्डन, लेझर शो, बाग, लहान मुलांचे खेळ, वाहनतळ इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.