राहुल गांधी यांची खासदारकी रहित !

नवी देहली – सुरत सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रहित करण्यात आली. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटक येथे झालेल्या एका प्रचारसभेत गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी २३ मार्चला सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे नियमानुसार त्यांचे संसद सदस्यत्व रहित झाले आहे. यापूर्वी इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचीही खासदारकी वेगवेगळ्या प्रकरणांत रहित झाली होती. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेसने २४ मार्चला संध्याकाळी पक्षाच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आणि आघाडीच्या संघटना प्रमुखांची बैठक बोलावली होती. दुसरीकडे राहुल गांधी यांची खासदारकी रहित झाल्यानंतर ते ज्या मतदारसंघातून निवडून आले होते त्या केरळमधील वायनाड मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याविषयी निवडणूक आयोग विचार करत असून एप्रिलमध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते, असे म्हटले
जात आहे.

१. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत रहाणार. हे भाजपवाल्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रहित करून समस्या संपतील, असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही संसदीय चौकशी समितीची मागणी करत राहू. आम्ही लढत राहू. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला कारागृहामध्ये जावे लागले, तरी आम्ही सिद्ध आहोत.

२. काँग्रेस सरकारचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राहुल गांधी यांची खासदारकी रहित करणे हे हुकूमशाहीचे उदाहरण आहे. भाजपने अशाच प्रकारे इंदिरा गांधी यांच्यावर कारवाई केली होती, हे भाजप विसरत आहे; पण तेव्हा त्याला तोंडावर पडावे लागले होते. राहुल गांधी देशाचा आवाज आहेत, जे हुकूमशाहीविरुद्ध आहेत. ते आणखी भक्कम होतील.

(म्हणे) ‘मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे’ – राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘कुणाची मानहानी करणे म्हणजे भारताच्या आवाजासाठी लढणे’, असे सांगणे, ही भारतियांच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानासाठीही शिक्षा होणे आवश्यक आहे !

राहुल गांधी यांनी खासदारकी रहित झाल्यानंतर ट्वीट करून त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतेही मूल्य चुकवण्यासाठी सिद्ध आहे.’