बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानातील २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब

(प्रतिकात्मक चित्र)

मडगाव, २३ मार्च (वार्ता.) – बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवठा करण्यात आलेला २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब झाल्याची घटना समोर आली आहे.
गोवा सरकारने ३ मासांहून अधिक कालावधीसाठी शिधा न नेणार्‍यांचे शिधापत्रक रहित करण्यात येणार, असे घोषित केले आहे. यामुळे शिधा न घेता शिधापत्रिका बाळगणार्‍यांनी शिधा नेण्यास प्रारंभ केला आहे; मात्र मार्च मासात प्रतिदिन बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य उपलब्ध नसल्याचे ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

या तक्रारीमुळे ‘आप’चे स्थानिक आमदार वेंझी व्हिएगस आणि नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी यांनी बाणावली येथील स्वस्त धान्य पुरवठा करणार्‍या दुकानांना भेटी दिल्या. या वेळी स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करण्यात आलेला २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांच्या मते त्यांनी मार्च मासात आवश्यक धान्याचा पुरवठा बाणावली येथे केला होता. आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले, ‘‘सरकार धान्याचा पुरवठा करत असले, तरी धान्य गोदामातून उचलून दुकानात आणण्याचा खर्च स्वस्त धान्य दुकानदाराला उचलावा लागतो. यामुळे त्यांना हे दुकान चालवणे शक्य होत नाही. त्यामुळे ते वाहतूक खर्च भागवण्यासाठी चोरीच्या मार्गाने धान्य विकण्यास प्रवृत्त होतात. या सर्व प्रक्रियेला सरकारच उत्तरदायी आहे.’’ (चोराने केलेल्या चोरीचे असे समर्थन करणे आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांना शोभते का ? अशाने भ्रष्टाचार न वाढल्यासच नवल ! पोलीस कारवाई करत नाहीत; म्हणून उद्या अशा प्रकारे कुणी गुन्हेगारांना शिक्षा देऊ लागले, तर ते चालेल का ? – संपादक)