महिलांनी स्वत:तील शौर्य जागृत करून रणरागिणी बनणे आवश्यक आहे ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

‘जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन’च्या वतीने पुणे येथे कार्यक्रम !

मार्गदर्शन करतांना कु. क्रांती पेटकर, तसेच व्यासपिठावर उपस्थित मान्यवर

पुणे – इतिहासात महिलांना दुय्यम स्थान होते, असा खोटा प्रचार सध्या केला जातो; मात्र ते चुकीचे आहे. भारताला अनेक पराक्रमी आणि कर्तृत्ववान महिलांचा इतिहास लाभला आहे; परंतु दुर्दैवाने आपल्याला खरा इतिहास सांगितला जात नाही. पूर्वीच्या स्त्रिया धर्माचरण करत होत्या. त्यामुळे त्यांना ईश्वराची शक्ती मिळत होती; परंतु आज अनेक स्त्रिया पाश्चात्त्य संस्कृतीनुसार आचरण करत असल्याने स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यासाठी महिलांनी अबला न होता धर्माचरण करून आणि स्वत:तील शौर्य जागृत करून रणरागिणी बनणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले. येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात महिलादिनाच्या निमित्त ‘जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन’च्या अंतर्गत ‘संगिनी नारी संघटने’च्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

हा कार्यक्रम ‘जैन सोशल ग्रुप’ महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्री. दिलीपभाई मेहता यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थित महिलांना ‘हिंदु स्त्रियांचा गौरवशाली इतिहास, महिलांची सद्यस्थिती आणि धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ६७० हून अधिक महिला उपस्थित होत्या.